अतिरिक्त शिक्षकांचा ‘गुंता’ कायम!
By Admin | Updated: February 14, 2017 01:55 IST2017-02-14T01:52:04+5:302017-02-14T01:55:49+5:30
६३ पैकी केवळ १२ शिक्षक रुजू : तीन शाळांचा नकार, तीन शिक्षक न्यायालयात

अतिरिक्त शिक्षकांचा ‘गुंता’ कायम!
वाशिम : संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या ६३ माध्यमिक शिक्षकांपैकी आतापर्यंत केवळ १२ शिक्षक रुजू झाले असून, तीन शाळांनी तर शिक्षकांना रुजू करून घेण्यास चक्क नकार दिला.
शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होत असताना, पटसंख्येनुसार शिक्षक संख्या हे धोरणही शासनाने अंमलात आणले. साधारणत: सात-आठ वर्षांपूर्वी शाळांमध्ये बोगस विद्यार्थी पटसंख्या असल्याच्या संशयावरून शिक्षण विभागाने राज्यभर एकाच दिवशी पट पडताळणी मोहीम राबविली. या मोहिमेतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. बोगस पटसंख्येला चाप बसला, तर दुसरीकडे विद्यार्थी संख्या घटल्याने खासगी शाळांवरील शिक्षकही अतिरिक्त ठरले. दरवर्षी शिक्षण विभागातर्फे घेण्यात येणार्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांची संख्या निश्चित केली जाते. वाशिम जिल्ह्यात सन २0१५-१६ पर्यंत माध्यमिक शाळांवरील तब्बल ६३ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. या अतिरिक्त शिक्षकांची संपूर्ण माहिती ऑनलाइनद्वारे राज्याच्या शिक्षण विभागाकडे सादर केली. या माहितीच्या आधारे पाच महिन्यांपूर्वी ऑनलाइन समायोजन प्रक्रिया राबविण्यात आली. ६३ पैकी २६ शिक्षकांचे समायोजन जिल्हा स्तरावर, तर उर्वरित ३७ शिक्षकांचे समायोजन विभागीय स्तरावर करण्यात आले. जिल्हा स्तरावरील २६ पैकी अद्यापपर्यंत केवळ १२ शिक्षक रुजू झाले असून, उर्वरित १४ शिक्षकांना समायोजनाची प्रतीक्षा आहे. तीन शाळांनी नकार दिल्याने शिक्षकांचे समायोजन होऊ शकले नाही. अन्य तीन शिक्षक दाद मागण्यासाठी न्यायालयात गेल्याने या तीन शिक्षकांची समायोजन प्रक्रिया न्यायप्रविष्ट झाली. एका शिक्षकाची माहिती चुकीची भरण्यात आल्याने ते समायोजन अद्याप होऊ शकले नाही, तर सात शिक्षकांचे समायोजन पायाभूत पदसंख्येत जागा उपलब्ध नसल्याने होऊ शकले नाही. ऑनलाइन माहिती भरताना समायोजित शाळेत पद रिक्त असल्याचे दाखविण्यात आले. त्यामुळे संबंधित अतिरिक्त शिक्षकांनी सदर शाळांची निवड केली. मात्र, त्या शाळेत पायाभूत पदसंख्येत जागाच उपलब्ध नसल्याने सात शिक्षकांचे समायोजन झाले नाही.
आता सन २0१६-१७ च्या संचमान्यतेनुसार परत काही शिक्षक अतिरिक्त ठरतील किंवा शाळांमध्ये रिक्त पदे निर्माण होऊ शकतील. यानुसार सध्याच्या अतिरिक्त शिक्षकांचे त्या-त्या शाळांवर समायोजन होईल, असे माध्यमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले.