रेल्वेस्थानक परिसरात वाहनधारकांवर कारवाईचा बडगा
By Admin | Updated: May 3, 2016 02:06 IST2016-05-03T02:06:47+5:302016-05-03T02:06:47+5:30
रेल्वे न्यायालयाच्या पथकाची वाशिम रेल्वे स्थानकावर कारवाई.

रेल्वेस्थानक परिसरात वाहनधारकांवर कारवाईचा बडगा
शिखरचंद बागरेचा / वाशिम
स्थानिक रेल्वे स्टेशन प्लॅटफार्मवर रेल्वेगाडीच्या आगमनाप्रसंगी गर्दी करणार्या ऑटो चालक व फेरीवाले विक्रेत्यांवर रेल्वे न्यायालयाचे न्यायाधीश राहुल थोरात यांच्या पथकाने २ मे रोजी दंडात्मक कारवाई केली. एकूण ५२ वाहनधारकांकडून १0 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
वाशिम रेल्वेस्थानकावरील प्लॅटफार्मवर रेल्वेगाडीचे आगमनप्रसंगी अाँटोचालक व फेरीवाले विक्रेत्यांची गर्दी मोठय़ा प्रमाणात होत असल्याची माहिती भुसावळ रेल्वे विभागाला मिळाल्यावरून सदरची कारवाई करण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले. २ मे रोजी सकाळी १0 वाजता अमरावती ते तिरुपती रेल्वे गाडीचे वाशिम रेल्वेस्थानकावर आगमन होताच भुसावळ रेल्वे विभागाचे न्यायाधीश राहुल थोरात व आरपीएफ निरीक्षक मीणा, तिकीट निरीक्षक राजू सैबेवार यांनी त्वरित रेल्वे स्थानकावर उतरुन प्लॅटफार्मवर गर्दी केलेल्या ऑटोचालकांना व किरकोळ वस्तूची विक्री करणार्या फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी ऑटोचालकांकडून प्रत्येकी शंभर रुपये, तर फेरीवाल्यांकडून प्रत्येकी पाचशे रुपये, असा दंड वसूल करण्यात आला. अचाकन धाडसत्र सुरू झाल्याने वाहनधारकांमध्ये एकच गोंधळ उडाला. नियमांना धाब्यावर बसविणार्या तब्बल ५२ जणांवर ही कारवाई करण्यात आली. यापुढे ऑटोचालकांनी व फेरीवाल्यांनी प्लॅटफार्मवर थेट येऊ नये, अशी ताकीद देण्यात आली. याप्रसंगी एकाही ऑटोचालक व फेरीवाल्यांकडे प्लॅटफार्म तिकीट आढळून आले नाही. सुमारे दोन तास चाललेल्या या मोहिमेत आरपीएफ उपनिरीक्षक कांबळे, हवालदार संतोष घुगे, स्टेशन मास्तर यांच्यासह रेल्वेस्टेशनच्या कर्मचार्यांचा यामध्ये समावेश होता.