जास्त दराने खतांची विक्री केल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:30 IST2021-05-29T04:30:25+5:302021-05-29T04:30:25+5:30
वाशिम : जिल्हयातील शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात रासायनिक खतांची किमतीपेक्षा जास्त दराने विक्री केल्यास खत विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा इशारा ...

जास्त दराने खतांची विक्री केल्यास कारवाई
वाशिम : जिल्हयातील शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात रासायनिक खतांची किमतीपेक्षा जास्त दराने विक्री केल्यास खत विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा खत परवाना अधिकारी वाशिम यांनी दिला आहे.
पावसाळ्याची चाहूल लागताच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामात रासायनिक खते व बियाण्यांच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. युरियावगळता इतर रासायनिक खतांच्या किमती जरी वाढलेल्या असल्या तरी केंद्र सरकारने रासायनिक खतांवरचे अनुदान वाढविल्यामुळे विविध कंपन्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या रायानिक खतांच्या ५० किलो बॅगच्या किमती जाहीर केल्या आहे.
तरी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांची खरेदी करतांना खताच्या किमती कंपनीनिहाय व ग्रेडनिहाय जाहीर केलेल्या दराप्रमाणेच खरेदी करावी. रासायनिक खत विक्रेत्यांकडे असलेल्या ई-पॉस मशीनची खत खरेदी केल्याची पावती विक्रेत्यांकडून घ्यावी. त्यावरून रासायनिक खतांच्या किमतीची पडताळणी करता येईल.
खतांची गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडून रितसर पावती घेऊन खरेदी करावी. खताच्या खरेदीची पावती पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावी. भेसळीची शंका दूर करण्यासाठी खतांची पाकिटे व गोणी सीलबंद/मोहोरबंद असल्याची खात्री करावी. कृषी निविष्ठाविषयी असलेल्या अडचणी/तक्रारी सोडविण्यासाठी तसेच मार्गदर्शनासाठी कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० यावर संपर्क साधावा तसेच नजीकच्या कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी किंवा संनियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी व्ही. एस. बंडगर यांनी कळविले आहे.
कंपनीने जाहीर केलेल्या ग्रेडनिहाय खतांच्या किमतीपेक्षा जास्त दराने कोणत्याही कृषी सेवा केंद्र संचालकाने विक्री करू नये. अन्यथा त्यांचा खत विक्रीपरवाना खत नियंत्रण आदेशान्वये रद्द केला जाईल.
.. शंकर तोटावार
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
................................