आरोपीसह पोलीस पथक वाशिममध्ये दाखल
By Admin | Updated: May 23, 2016 01:27 IST2016-05-23T01:27:09+5:302016-05-23T01:27:09+5:30
आणखी दोघांना अटक : बियाणे आज पोहचणार.

आरोपीसह पोलीस पथक वाशिममध्ये दाखल
वाशिम: बियाणे महामंडळाच्या गोडाऊनमधून दरोडेखोरांनी लंपास केलेला २३ लाख रुपये किमतीचे सोयाबीन व हरभर्याच्या बियाण्यांसह बाश्री येथून दोन आरोपीला घेऊन पोलिसांचे एक तपास पथक वाशिम शहरामध्ये रविवारी दुपारी दाखल झाले.
गेल्या चार दिवसांपूर्वी महाबीजच्या गोदामामधून दरोडेखोरांनी २३ लाखांचे बियाणे लंपास केले होते. या घटनेमुळे केवळ वाशिम शहरच नव्हे तर अमरावती विभागातील पोलीस यंत्रणा हादरून गेली होती. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर व उपविभागीय पोलीस अधिकारी जयकुमार चक्रे यांनी या दरोड्याचा तपास लावण्याची जबाबदारी रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रऊफ शेख, वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर पवार यांच्यासह पोलीस कर्मचार्यांवर सोपविली.
रिसोडचे ठाणेदार रऊफ शेख यांचा मराठवाड्यातील गुन्हेगारी क्षेत्रावर चांगलाच वचक आहे. मराठवाड्यातील अनुभवाच्या जोरावर, ठाणेदार रऊफ शेख यांनी गोपनीय सूत्राकडून माहिती गोळा करून दरोडेखोरांचा शोध लावण्यात यश संपादन केले. वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन, रिसोड पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी गेल्या चार दिवसांपासून रखरखते ऊन अंगावर झेलून तपासामध्ये कुठलीच उणीव ठेवली नाही.
तपास पथकांना दरोड्यामध्ये चोरी गेलेले बियाणे बाश्री (भगवान) शहरापासून तीन कि.मी. अंतरावर असलेल्या गाडेगाव या गावाजवळील शेतशिवारात असलेल्या एका टिनाच्या शेडमध्ये आढळून आले. यावेळी पोलिसांनी बालाजी साहेबराव शिंदे (रा. मोहा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) व राजेंद्र बापुराव सरवदे (रा. बाश्री, जि. सोलापूर) या दोघांना अटक करून एक मालवाहू ट्रक (एम.एच. २४ जे ९३७७ ) यासह हरभरा व सोयाबीनचे बियाणे जप्त केले.