मालेगाव : हैदराबाद येथील तीन वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करणाºया मालेगाव तालुक्यातील अमानवाडी येथील २३ वर्षीय आरोपी शाम भीमराव सोळंकी याला मालेगाव, जऊळका व हैदराबाद पोलिसांनी १८ फेब्रुवारी रोजी चिमुकल्यासह अमानवाडी येथून ताब्यात घेतले.अमानवाडी येथील शाम भीमराव सोळंकी हा रोजगारानिमित्त हैदराबाद येथे गेला होता. दरम्यान ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास हैदराबाद येथे रुद्रमणी शिवकुमार एस. हा ३ वर्षीय चिमुकला त्याच्या दोन बहिणींसोबत एका हॉटेलसमोर खेळत असताना आणि त्याचवेळी त्याची आई पाणी आणण्यासाठी बाहेर गेल्याची संधी साधून शाम सोळंकी याने रुद्रमणी शिवकुमार या चिमुकल्याचे अपहरण करण्याचा बेत आखला. घटनास्थळावरून चिमुकल्याला सोबत घेत हैदराबाद रेल्वे स्टेशन गाठले आणि तेथून सेवाग्राम, अकोला रेल्वे स्टेशन असा प्रवास करीत अकोला येथून बसने मालेगाव गाठले. १० फेब्रुवारी रोजी सकाळी जऊळका मार्गे मूळ गावी अमानवाडी येथे आरोपी हा चिमुकल्यासह पोहचला. दरम्यान, हैदराबाद येथे रुद्रमणी शिवकुमार याच्या आईने आपल्या मुलाचे अपहरण शाम सोळंकी याने केल्याची तक्रार पोलिसांत नोंदविली. या तक्रारीच्या आधारे हैदराबाद पोलिसाचे पथक १७ फेब्रुवारी रोजी मालेगाव येथे पोहचले. हैदराबाद व मालेगाव पोलिसांनी अमानवाडी रेल्वे स्टेशन व परिसरात आरोपीसह चिमुकल्याचा शोध घेतला. परंतू, शोध न लागल्याने आरोपी व चिमुकल्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करून पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले. यावरून व्हिडीओमधील वर्णनाचा मुलगा व आरोपी हा ग्राम अमाणवाडी येथील एका मंदिराचे मागे असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता, आरोपी व चिमुकल्यास ताब्यात घेतले. बालकासह आरोपीला हैदराबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. ही कारवाई मालेगावचे ठाणेदार आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनात गजानन काळे, कुलदीप ताजणे, समाधान मोघाड यांनी पार पाडली.
हैदराबाद येथील चिमुकल्याचे अपहरण करणारा आरोपी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 17:28 IST
Crime News शाम भीमराव सोळंकी याला मालेगाव, जऊळका व हैदराबाद पोलिसांनी १८ फेब्रुवारी रोजी चिमुकल्यासह अमानवाडी येथून ताब्यात घेतले.
हैदराबाद येथील चिमुकल्याचे अपहरण करणारा आरोपी गजाआड
ठळक मुद्दे शाम सोळंकी याने रुद्रमणी शिवकुमार या चिमुकल्याचे अपहरण करण्याचा बेत आखला. १० फेब्रुवारी रोजी मूळ गावी अमानवाडी येथे आरोपी हा चिमुकल्यासह पोहचला.