लाच स्वीकारताना ग्रामसेवक जेरबंद
By Admin | Updated: March 25, 2017 19:23 IST2017-03-25T19:23:51+5:302017-03-25T19:23:51+5:30
सिंचन विहिरीच्या तांत्रिक मान्यता व कार्यारंभ आदेश मिळवून देण्यासाठी दोन हजार रुपयाची लाच स्वीकारताना बोराळा जहांगीर येथील ग्रामसेवकाना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

लाच स्वीकारताना ग्रामसेवक जेरबंद
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 25 - सिंचन विहिरीच्या तांत्रिक मान्यता व कार्यारंभ आदेश मिळवून देण्यासाठी दोन हजार रुपयाची लाच स्वीकारताना बोराळा जहांगीर येथील ग्रामसेवकाना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. भगवान सखाराम भिसडे (५६)असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे.
मालेगाव तालुक्यातील बोराळा जहॉगीर येथील तक्रारदाराच्या पतीच्या नावाने सहस्त्र सिंचन योजनेंतर्गत विहीर मंजूर झालेली आहे. या विहिरीसंदर्भातील सर्व कागदपत्रे व फाईल देण्याचे ग्रामसेवक भिसडे याने सांगितले तसेच विहीर बांधण्यासाठी तांत्रिक मान्यता व कार्यारंभ आदेश मिळवून देण्यासाठी वरिष्ठांना दोन हजार रुपये द्यावे लागतात, असे सांगून दोन हजार रुपये लाचेची मागणी केली.
यासंदर्भात तक्रारदाराने २० मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. या तक्रारीची पडताळणी २४ मार्च रोजी करण्यात आली. पडताळणीदरम्यान ग्रामसेवक भिसडे याने दोन हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. लाचेची दोन हजार रुपयांची रक्कम बोराळा येथे गजानन जटाळे यांच्या घरी देण्या-घेण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे २५ मार्च रोजी सापळा रचण्यात आला. यावेळी भिसडे याने पंचासमक्ष दोन हजार रुपये स्वीकारले. रक्कम स्वीकारताच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने भिसडे याला रंगेहात पकडून रकमेसह ताब्यात घेतले. आरोपीविरूद्ध शिरपूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही करण्यात आली.