सासुरवाशिणीच्या सन्मानाचा अरक पॅटर्न
By Admin | Updated: February 19, 2015 01:52 IST2015-02-19T01:52:39+5:302015-02-19T01:52:39+5:30
लेकींचा आगळावेगळा गौरव; गावतील लेकी एवढाच जावयांचाही सन्मान.
सासुरवाशिणीच्या सन्मानाचा अरक पॅटर्न
मंगरूळपीर (जि. वाशिम) : अलीकडे स्त्री-पुरुष समानता, महिला सक्षमीकरण, स्त्री-भ्रूणहत्या यासंदर्भात मोठय़ा प्रमाणात जनजागृती होत आहे. यातूनच अलीकडच्या काळात महिलांकडे पाहण्याच्या समाजाच्या दृृष्टीकोनात अनेक सकारात्मक बदल होतांना दिसताहेत. पण, वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील अरक गावाने या विचाराला अध्यात्म आणि भक्तीची जोड देत गावातील सासुरवाशीण झालेल्या लेकींचा आगळावेगळा गौरव केला. लेकी-बाळींच्या माहेरपणाला जपणारा अरक ग्रामवासीयांचा हा प्रयोग सासुरवाशिणीच्या सन्मानाचा अरक पॅटर्नह्णआदर्श ठरू पाहत आहे. वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातलं अरक गाव.. गावाचंग्रामदैवत असलेल्या जगदेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त १८ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.या महाप्रसादासाठी महिलांची मोठय़ा प्रमाणात झुंबड उडाली होती. मग पंगतही बसली गर्दी तर अगदी मोठीच आणि त्यातही पंगत महिलांची..पण कुठे ना गोंधळ आणि ना कोणतीही बेशिस्त. सर्व अगदी शिस्तीत अन तेही शांततेने..पंगत वाढून झाली अनं गावातील जेष्ठ महिलांनी ताटावर बसलेल्या महिलां समोरच्या पात्राला आदरपूर्वक नमस्कार केला.. अन जेवणाला सुरुवात झाली. मंडळी, ही पंगत या गावातील लग्न होवून सासरी गेलेल्या लेकी-बाळींची..अरक हे दीड हजार लोकवस्तीचे गाव. महाशिवरात्रीच्या दुसर्या दिवशी येथे मोठा सोहळा पार पडला.एरव्ही, दिवाळीला एखादेवेळी न येवू शकणारी गावातील प्रत्येक सासुरवाशीण मुलगी गावात आपल्या पती, मुला-बाळांसह आल्या होत्या. गावातील प्रत्येक मुलगी ही सार्या गावाची लेक या लेकीचा जगदेश्वर संस्थानच्यावतीने चोळीचे कापड आणि माहेरची शिदोरी देत प्रत्येकीचा सन्मान करण्यात आला. यामध्ये गावातील सर्व वयोगटातील लेकी-बाळी माहेरपणाला आलेल्या होत्या. या कार्यक्रमासाठी गावाच्या जावयांनाही आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले होते.गावतील लेकी इतकाच जवायांचाही सन्मान करण्यात आला. प्रत्येक जावयाचाही शाल-श्रीफळ देवून ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. या गावातील जगदेश्वर संस्थानच्या कामाच्या माध्यमातून गावाला एकीच्या सूत्रात बांधले.