राज्यात ९0 गावे-वाड्यांमध्ये टँकर!

By Admin | Updated: October 27, 2014 00:01 IST2014-10-26T22:50:16+5:302014-10-27T00:01:03+5:30

हिवाळ्यातच पाणीटंचाई : उपाययोजनेला प्राधान्य

90 villages and hamlets tanker in the state! | राज्यात ९0 गावे-वाड्यांमध्ये टँकर!

राज्यात ९0 गावे-वाड्यांमध्ये टँकर!

वाशिम : पावसाळा संपत नाही; तोच पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. हिवाळ्याच्या सुरूवातीलाच राज्यभरातील ३७ गावे आणि ५३ वाडीवस्त्यांची तहान टँकरच्या पाण्याने भागविली जात आहे.
साधारणत: हिवाळ्याच्या शेवटी पाणीटंचाई जाणवायला सुरूवात होते. उन्हाळ्याच्या प्रारंभी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. २0१४ मध्ये मात्र ऑक्टोबरपासूनच टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. यावर्षी पावसाळा उशिराने सुरू झाला. जून महिन्यात १४0५ गावे आणि ३ हजार ४३६ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा झाला. जुलैमध्ये ही संख्या आणखी वाढली. जुलै १५५९ गावे आणि ३९७४ वाडयांमध्ये टँकर मधून पाणीवाटप झाले. ऑगस्टमध्येही १५५६ टँकर्स लागले आणि १३१३ गावे तसेच ३३७0 वाड्यांना पाणी पुरवावे लागले. सप्टेंबरमध्ये ९३ गावे, वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. ऑक्टोबरमध्येही सद्यस्थितीत ९0 गावे-वाड्यांना टँकर्सचे पाणी तहान भागवत आहे. पाण्याच्या घोटभर थेंबासाठी वनवन भटकणार्‍या राज्यातील ९0 गावांना टँकरचे पाणी मिळत आहे.भौगोलिक रचना, पाऊस, भूपृष्ठावरील जलसाठय़ाची स्थिती, पाणी वापराचे नियोजन आणि बाष्पीभवनाचे प्रमाण या घटकांवर पाणीटंचाईची स्थिती प्रामुख्याने अवलंबून असते. कोकणात पावसाळ्यातील सरासरी ९५ दिवसांमध्ये ३ हजार १६१ मि.मी., विदर्भात ५१ दिवसांमध्ये १ हजार १0६ मि.मी., तर पश्‍चिम महाराष्ट्रात ५१ दिवसांमध्ये १ हजार मि.मी. पाऊस होतो. हवामान खात्याने सत्तर वर्षांतील पाऊसमान आणि पर्जन्य दिवसाच्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढला आहे. राज्यात वर्षांतील ५९ दिवसांमध्ये पाऊस होतो, पण आता विपरित हवामानाचा पावसाळ्यावर परिणाम होऊ लागला आहे.
सद्यस्थितीत सर्वाधिक २२ टँकर्स मराठवाड्यातील २७ गावे-वाड्यांमध्ये लागले आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील ४४ गावे-वाड्यांसाठी, तसेच पश्‍चिम विदर्भातील ३ गावांसाठी प्रत्येकी १0 टँकर्स आहेत. उत्तर महाराष्ट्रातील १६ गावे-वाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. कोकण आणि पूर्व विदर्भ मात्र तीव्र पाणीटंचाईमुक्त झाला आहे. सध्या या दोन्ही विभागात एकही टँकर सुरू नाही. कोकण आणि पूर्व विदर्भ ऑगस्टमध्येच टँकरमुक्त झाला होता.

Web Title: 90 villages and hamlets tanker in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.