अवैध विक्री होणारी ७६ हजार रुपयांची दारू जप्त!

By Admin | Updated: May 14, 2017 02:18 IST2017-05-14T02:18:55+5:302017-05-14T02:18:55+5:30

दोन आरोपींवर गुन्हे दाखल; वाशिम शहर पोलिसांची कारवाई.

76,000 worth of illicit liquor seized! | अवैध विक्री होणारी ७६ हजार रुपयांची दारू जप्त!

अवैध विक्री होणारी ७६ हजार रुपयांची दारू जप्त!

वाशिम : शहरातील किरकोळ देशी व विदेशी दुकानदारांकडून खरेदी केलेली दारू बेकायदेशीररीत्या ग्राहकांना विकण्याचा गोरखधंदा करणार्‍या दोन आरोपींना शहर पोलिसांनी रंगेहात पकडले. या दोघांकडून देशी, विदेशी दारू, बिअरच्या बॉटल्स व दोन मोटरसायकली जप्त करून दोघांवरही १३ मे रोजी गुन्हे दाखल करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने महामार्गापासून ५00 मीटर आतील दारू विक्रीची दुकाने बंद केल्यामुळे तळीरामांची चांगलीच पंचाईत झाली आहे. या तळीरामांची व्यवस्था करण्यासाठी अवैध मार्गाने दारू विक्रेत्यांची साखळी तयार झाल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष मोरे यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर ठाणेदार मोरे यांचे मार्गदर्शनात डिटेक्शन ब्रँचचे पोलीस कर्मचारी राजेश बायस्कर, मनोहर अष्टोनकर, सतीश गुडदे, ज्ञानदेव म्हात्रे, गजानन कराळे यांचा समावेश असलेल्या पथकाने गस्ती दरम्यान दोन वाहनचालकांच्या मुसक्या आवळल्या. यामध्ये संदीप मोहन जगदाळे (रा. कानरखेडा ता. सेनगाव जि. हिंगोली )व मंगश वसंता कंकाळ (रा. अल्लडा प्लॉट, वाशिम) यांचा समावेश आहे. या दोघांकडून पोलिसांनी दोन मोटारसायकल, देशी, विदेशी दारू असा एकूण ७६ हजाराचा मुद्देमाल जप्त करून त्यांना अटक केली. या दोघांविरुद्ध वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये मुंबई दारूबंदी कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

परवानाधारक किरकोळ विक्रेत्यांनी ठोक दारू विक्री करणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. जप्त केलेल्या दारूच्या बॉटल्सवरील बॅच नंबरची दारू कोणत्या दुकानदाराकडे होती, याचा शोध घेऊन त्यांच्यावरसुद्धा कारवाई करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. दारू वाहतूकदारांच्या मुसक्या आवळण्यासाठी मुख्य दारू विक्रेत्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. त्या पद्धतीने आम्ही निश्‍चितच कारवाई करणार आहोत.
- संतोष मोरे, ठाणेदार, वाशिम शहर पोलीस स्टेशन

Web Title: 76,000 worth of illicit liquor seized!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.