चेहेल येथे ६.५ लाखांची घरफोडी
By Admin | Updated: April 20, 2015 22:55 IST2015-04-20T22:55:01+5:302015-04-20T22:55:01+5:30
मंगरुळपीर तालुक्यातील चेहेल येथील प्रकार.

चेहेल येथे ६.५ लाखांची घरफोडी
मंगरुळपीर (जि. वाशिम): घराचा दरवाजा तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागीने असा एकूण साडेसहा लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना, मंगरुळपीर पोलीस स्टेशन अंतर्गत चेहेल येथे २0 एप्रिल रोजी रात्री ३ वाजताच्या सुमारास घडली. मंगरुळपीर तालुक्यात चेहेल येथे विलास देवमन चौधरी यांच्या मुलीचे २८ एप्रिल रोजी लग्नसमारंभ आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी वधूकरिता सोन्याचे दागीने बनविण्यात आले व बस्तासुद्धा घेण्यात आला होता; परंतु २0 रोजी रात्री तीनच्या सुमारास विलास चौधरी यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून कपाटातील दोन लाख पन्नास हजार रुपये रोख आणि चार लाख रुपये किमतीचे दागीने अशी एकूण सहा लाख पन्नास हजार रुपयांची धाडसी चोरी झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. चोरी झाल्याचे घरच्यांच्या सकाळी लक्षात येताच मंगरुळपीर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली. मंगरुळपीर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार गिरमे यांनी तातडीने श्वान पथकाला पाचारण केले. घटनास्थळाला मंगरुळपीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी वाळके तसेच वाशिम येथील श्वानपथकाने भेट देऊन पाहणी केली. काही महत्त्वाचे ठसे मिळाल्याची माहिती आहे. पुढील तपास ठाणेदार हेमंत गिरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि कलम ४५७, ३८0 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.