कार्यालयांत ५० टक्के उपस्थिती, शाळांत मात्र शंभर टक्के शिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:40 IST2021-04-06T04:40:37+5:302021-04-06T04:40:37+5:30
वाशिम : राज्यभरात कोरोना संसर्गाचा उद्रेक होत असल्याने शासनाने विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये एकूण क्षमतेच्या ५० टक्के कर्मचाऱ्यांना बोलावण्याचे ...

कार्यालयांत ५० टक्के उपस्थिती, शाळांत मात्र शंभर टक्के शिक्षक
वाशिम : राज्यभरात कोरोना संसर्गाचा उद्रेक होत असल्याने शासनाने विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये एकूण क्षमतेच्या ५० टक्के कर्मचाऱ्यांना बोलावण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, याचवेळी शाळांमध्ये मात्र शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे.
राज्यात कोरोना संसर्गाचा कहर सुरू आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना आणि कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यात शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये क्षमतेच्या ५० टक्के कर्मचारी आळीपाळीने बोलावण्याचे निर्देश शासनाने ४ एप्रिलच्या शासन निर्णयान्वये विविध शासकीय कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्येही क्षमतेच्या एकूण ५० टक्के कर्मचाऱ्यांनाच बोलाविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तथापि, शाळांमध्ये मात्र अद्यापही १०० टक्के शिक्षकांना बोलावले जात आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, शिक्षण विभागाने यासंदर्भात स्वतंत्र आदेश काढून शाळांमध्ये ५० टक्केच उपस्थिती अनिवार्य करण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात आहे.
----------------
कोट : राज्य शासनाने ४ एप्रिल रोजी आदेश काढून शासकीय कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये एकूण क्षमतेच्या ५० टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांचीच उपस्थिती ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. शासकीय कार्यालयात त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली, परंतु शाळांमध्ये मात्र अद्यापही १०० टक्के शिक्षकांना बोलावले जात आहे. याची दखल शिक्षण विभागाने घेण्याची आवश्यकता आहे.
- संदीप देशमुख,
जिल्हाध्यक्ष, शिक्षक महासंघ, वाशिम
-----------------
शिक्षक महासंघाचे उपसंचालकांना निवेदन
राज्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग आणि त्यामुळे निर्माण झालेली भयावह परिस्थिती पाहता, शासनाने शासकीय कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये केवळ ५० टक्के उपस्थिती ठेवण्याच्या सूचना दिल्या असतानाही शैक्षणिक संस्थांमध्ये १०० टक्के शिक्षकांना बोलावले जात आहे. या प्रकारामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, शिक्षक महासंघ, अमरावतीचे अध्यक्ष शेखर भोयर यांनी ५ एप्रिल रोजी यासंदर्भात शिक्षण उपसंचालक, अमरावती यांना निवेदन देत अमरावती विभागातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना शाळांमध्ये ५० टक्के उपस्थिती लागू करण्याबाबत आदेश देण्याची मागणी केली आहे.
-------------------
जिल्ह्यात नववी ते बारावीचे शिक्षक २,५५१
जिल्ह्यात सहावी ते आठवीचे शिक्षक १,६३४
जिल्ह्यात पहिली ते पाचवीचे शिक्षक ३,०२१