वाशिम तालुक्यात ४६८ घरकुले साकारणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:40 IST2021-01-19T04:40:55+5:302021-01-19T04:40:55+5:30
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील बेघर कुटुंबांना घरकुलाचा लाभ दिला जातो. सन २०१६ मध्ये मंजूर यादीनुसार २०१६-१७ ...

वाशिम तालुक्यात ४६८ घरकुले साकारणार!
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील बेघर कुटुंबांना घरकुलाचा लाभ दिला जातो. सन २०१६ मध्ये मंजूर यादीनुसार २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने पात्र लाभार्थींना घरकुलाचा लाभ दिला जात आहे. या मंजूर यादीतील २०२०-२१ हे वर्ष अंतिम असून, वाशिम तालुक्यातील ४६८ लाभार्थींना घरकुलासाठी निधी मिळणार आहे. अनु.जमातीसाठी ११ आणि इतर प्रवर्गातील ४५७ अशा एकूण ४६८ लाभार्थींनी शासन निकषानुसार घरकुलाचे बांधकाम सुरू करावे, अशा सूचनाही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने दिलेल्या आहेत. दरम्यान, घरकूल मंजूर झाले, असे सांगून त्रयस्थ व्यक्ती किंवा दलालाकडून लाभार्थींची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सन २०१६ मधील मंजूर यादीनुसार पात्र लाभार्थींना घरकूल मंजूर झालेले असून, लाभार्थींना दलालापासून सावध राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले.