जल जीवन मिशनमधून ४ हजार कुटुंबांना मिळणार नळजोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:49 IST2021-09-08T04:49:58+5:302021-09-08T04:49:58+5:30
मानोरा तालुक्यातील सर्वांना शुद्ध व पुरेसे पाणी मिळायला हवे, यासाठी चोख नियोजन करण्यात येत आहे. त्यानुषंगाने जल जीवन मिशनमधून ...

जल जीवन मिशनमधून ४ हजार कुटुंबांना मिळणार नळजोडणी
मानोरा तालुक्यातील सर्वांना शुद्ध व पुरेसे पाणी मिळायला हवे, यासाठी चोख नियोजन करण्यात येत आहे. त्यानुषंगाने जल जीवन मिशनमधून विविध स्वरूपातील उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. मानोरा तालुक्यातील पाणीपुरवठा, नळजोडणीबाबत जिल्हा परिषद, वाशिम येथे ६ सप्टेंबर रोजी आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत आवश्यक कामाचे प्रस्ताव तयार करून प्रशासकीय मान्यता देण्यात आली. सप्टेंबरअखेर उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या.
तालुक्यात एकूण ११० गावांपैकी ७९ गावांत ग्रामीण नळपुरवठा योजना कार्यान्वित आहे. उर्वरित ४४ गावांमधे जीवन प्राधिकरणचा पाणीपुरवठा सुरू आहे. ग्रामीण पाणीपुरवठा, उपविभाग मानोराअंतर्गत १५ व्या वित्त आयोगातून वैयक्तिक कुटुंब नळजोडणीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले.
तालुक्यात एकूण ३५ हजार ४७ कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यापैकी १६ हजार ७२३ कुटुंबांकडे नळजोडणी असून ४३१७ कुटुंबांना १५ व्या वित्त आयोगातून नळजोडणी देण्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. रेट्रो फिटिंगमधून ११७० नळजोडणी देण्याची बाब प्रस्तावित असून त्यास तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्याची ई-निविदा काढून सप्टेंबरअखेर काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले.
............
कोट :
जल जीवन मिशनअंतर्गत अंगणवाडी व शाळांना पाणीपुरवठा करण्यासाठी नळजोडणी देण्याची बाब प्रस्तावित आहे. अंगणवाडी व शाळांचा १५ व्या वित्त आयोगाच्या आराखड्यात समावेश नसल्यास तो करून घ्यावा, असे निर्देश वरिष्ठांकडून बैठकीत देण्यात आले.
- एस. एन. राठोड
उपविभागीय अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, मानोरा.