वाशिम जिल्ह्यातील ३७ गावे बाधित
By Admin | Updated: January 3, 2015 01:23 IST2015-01-03T01:23:57+5:302015-01-03T01:23:57+5:30
गारपीटग्रस्त शेतकरी धडकले तहसील कार्यालयावर.

वाशिम जिल्ह्यातील ३७ गावे बाधित
वाशिम : गारपीट व अवकाळी पावसामुळे जिल्हय़ात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये ३७ गावे बाधित आढळून आली. नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन त्यासोबतच अहवाल सादर करण्याची सूचना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी संबंधित यंत्रणेला केली.
यासंदर्भात पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली व गारपीट, अवकाळी पावसामुळे जिल्हय़ात झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. जिल्हय़ातील तीन तालुक्यातील ३७ गावांना गारपीट व अवकाळी पावसाचा फटका बसला असून, अंदाजे ५ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. मालेगाव तालुक्यातील सर्वाधिक २५ गावांना या गारपीट व अवकाळी पावसाचा फटका बसला असून, कारंजा तालुक्यातील १0 व मंगरुळपीर तालुक्यातील दोन गावांमध्ये काही प्रमाणात नुकसान झाले असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी मालेगाव तालुक्यातील माळेगाव नकी येथील नुकसानीची पाहणी करत असताना पालकमंत्र्यांना दूरध्वनीवरुन नुकसानीची माहिती दिली, यावेळी पालकमंत्र्यांनी तेथील शेतकर्यांसोबतही दूरध्वनीवरुन संपर्क साधला व नुकसानीची माहिती घेतली. तसेच शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन देत शेतकर्यांना धीर दिला.
मंगरूळपीर तालुक्यामध्ये पूर, वनोजा परिसरात ३१ डिसेंबर रोजी रात्री झालेल्या गारपिटीमुळे जवळपास २५ हेक्टर फळबागांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज असल्याची माहिती तहसीलदार बळवंत अरखराव यांनी दिली. वाशिम, रिसोड व मानोरा परिसरात गारपीट झाली असून, तुरळक पाऊस पडला. कारंजा तालुक्याचा पोहा परिसरातील पोहा, शिवनगर, बेलमंडळ, पारवा कोहर, काजळेश्वर, उकर्डा, महागाव लोहगाव, मोर्हळ, वढवी, किसाननगर, लोहारा, चिंचखेड, चांदई, वालई, तुळजापूर आदी गावातील शेतकर्यांच्या रब्बी पिकांसह फळबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये गहू, हरभरा, तूर, पपई, कपाशी, पपई, संत्रा, निंबू, कांदा, डाळींब पिकांची लागवड केली होती.