कोविड रुग्णालयातील देयकांबाबत २९४ तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:43 IST2021-08-27T04:43:59+5:302021-08-27T04:43:59+5:30
वाशिम : खासगी कोविड रुग्णालयातील देयकांविषयी आतापर्यंत २९४ तक्रारी प्राप्त झाल्या असून देयक पडताळणी पथकाद्वारे या तक्रारींची पडताळणी करण्यात ...

कोविड रुग्णालयातील देयकांबाबत २९४ तक्रारी
वाशिम : खासगी कोविड रुग्णालयातील देयकांविषयी आतापर्यंत २९४ तक्रारी प्राप्त झाल्या असून देयक पडताळणी पथकाद्वारे या तक्रारींची पडताळणी करण्यात येत आहे. २६ ऑगस्ट रोजी झालेल्या जिल्हा संनियंत्रण व तक्रार निवारण समितीच्या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या जिल्हा संनियंत्रण व तक्रार निवारण समितीच्या सभेला जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, डॉ. संदीप हेडाऊ, महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. रणजित सरनाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुषमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची जिल्ह्यात एकत्रित अंमलबजावणी केली जात आहे. अंगीकृत रुग्णालयांमध्ये प्रत्येक पात्र रुग्णांना या जनआरोग्य योजनांचा लाभ देणे बंधनकारक आहे. यामध्ये जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित रुग्णालय व्यवस्थापनावर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिला. अंगीकृत नसलेल्या खासगी कोविड रुग्णालयातील देयाकांविषयी २९४ तक्रारी प्राप्त झाल्या असून पडताळणी पथकाद्वारे या तक्रारींची पडताळणी करण्यात येत आहे. या योजनेमध्ये अंगीकृत नसलेल्या खासगी कोविड रुग्णालयांनी शासनाने ठरवून दिल्यापेक्षा जास्त शुल्क घेतल्याच्या तक्रारींवरील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
०००००
५९ तक्रारी प्राप्त
डॉ. सरनाईक यांनी महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसाठी अंगीकृत रुग्णालयांमध्ये कोविड-१९ विषयी उपचार घेतलेल्या रुग्णांचे ५९ तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगितले. छाननीअंती यापैकी १४ अर्ज वैध ठरवून त्यांची नोंदणी योजनेच्या पोर्टलवर करण्यात आली. त्यापैकी ६ अर्ज निकाली निघाले असून उर्वरित ८ अर्जांवरील कार्यवाही सुरू असल्याचे ते म्हणाले.
००००००
विशेष पथके स्थापन
महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये अंगीकृत नसलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये शासकीय दरापेक्षा अधिक दराने बिल आकारण्यात आल्याच्या तक्रारींची पडताळणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने विशेष पथके स्थापन केली आहेत. याबाबतच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन शाखेमध्ये सादर करता येतील, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितले.