मोफत गणवेशांसाठी जिल्हय़ाला २.८0 कोटी रुपये!
By Admin | Updated: July 31, 2015 01:00 IST2015-07-31T01:00:22+5:302015-07-31T01:00:22+5:30
१२ ऑगस्टपर्यंत वितरण होणार गणवेशाचे वितरण, वाशिम जिल्ह्यातील ८२ हजार विद्यार्थ्यांना मिळणार लाभ.

मोफत गणवेशांसाठी जिल्हय़ाला २.८0 कोटी रुपये!
कारंजा लाड (जि. वाशिम): सर्व शिक्षा अभियानांतर्गत अनुसूचित जाती, जमाती, अपंग, तसेच दारिद्रय़रेषेखालील विद्यार्थ्यांना मोफत गणवेशांसाठी जिल्हय़ातील सहा पंचायत समित्यांना मिळून २ कोटी ८0 लाख १९ हजार ४२0 रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी सर्वच पंचायत समित्यांच्या खात्यात जमा करण्यात आला असून, या निधीतून जिल्हय़ातील ८२ हजार २१९ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश देण्यात येणार आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी राज्य शासनाच्यावतीने पहिली ते आठवीपयर्ंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाची योजना सुरू करण्यात आली आहे. वर्ग पहिली ते आठवीपर्यंतच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, तसेच दारिद्रय़रेषेखालील सर्व विद्यार्थी शासनाच्या मोफत गणवेश योजनेस पात्र ठरतात. या योजनेत भ्रष्टाचार होऊ नये म्हणून शिक्षण मंत्रालयाने शाळा व्यवस्थापन समितीलाच गणवेश खरेदी आणि वाटपाचे अधिकार दिले होते; परंतु गेल्या काही वर्षांमध्ये या योजनेंतर्गत अनेक विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नसल्याच्या तक्रारी पालक वर्गाकडून करण्यात आल्या.