शासकीय कार्यालयांकडे २.७0 कोटींचा कर थकीत
By Admin | Updated: March 27, 2015 01:37 IST2015-03-27T01:37:11+5:302015-03-27T01:37:11+5:30
वाशिम नगर परिषदेचा सर्वाधिक दोन कोटी १७ लाख ५0 हजार कर शासकीय कार्यालयांकडे थकीत.

शासकीय कार्यालयांकडे २.७0 कोटींचा कर थकीत
नंदकिशोर नारे /वाशिम: जिल्हय़ातील शासकीय कार्यालयाकडे नगर परिषदेचा थकीत कर कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहिती हाती आली आहे. रिसोड नगर परिषदेने पंचायत समिती कार्यालयातील गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयावरच थकीत कराअभावी जप्ती केल्याची घटना २३ मार्चला घडली. या अनुषंगाने जिल्हय़ात असलेल्या चार नगरपालिकेच्या थकीत करांची माहिती जाणून घेतली असता ती दोन कोटी ७0 लाख १२ हजार ६४0 रुपये असल्याची माहिती प्राप्त झाली. जिल्हय़ात सहा तालुके असून, दोन तालुक्यांमध्ये ग्रामपंचायत तर चार तालुक्यामध्ये नगर परिषद आहे. नगर परिषद असलेल्यांमध्ये वाशिम, कारंजा, मंगरूळपीर व रिसोडचा समावेश आहे. या नगर परिषद अंतर्गत असलेल्या शासकीय कार्यालयांमध्ये किती कर थकीत आहे, याची माहिती जाणून घेतली असता, कोणाकडे अनेक वर्षांंपासून तर कोणाकडे २0१४ -१५ मधील थकीत कर भरणे बाकी आहे. आजच्या घडीला वाशिम नगर परिषदेचा सर्वाधिक दोन कोटी १७ लाख ५0 हजार कर शासकीय कार्यालयांकडे थकीत आहे. कारंजा नगर परिषदेचा १७ लाख ६ हजार २0५, मंगरूळपीर नगर परिषदेचा २४ लाख ८२ हजार ५५४ तर रिसोड नगर परिषदेचा १0 लाख ७३ हजार ८८१ कर शासकीय कार्यालयांकडे थकीत आहे. रिसोड नगर परिषदेने थकीत करवसुलीसाठी जप्तीची मोहीम हाती घेतली असून, सुरुवात एका पेट्रोलपंपापासून केली. त्यानंतर २३ मार्चला पंचायत समिती कार्यालयातील गटविकास अधिकारी यांच्या दालनालाच कुलूप ठोकले. वाशिम नगर परिषद अंतर्गत येत असलेले शासकीय कार्यालयापैकी वीज वितरण कंपनीकडे २0 लाख रुपये, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे १७ लाख रुपये, जिल्हा परिषद जुनी व नवीनकडे २८ लाख रुपये, जिल्हा क्रीडा संकुल सात लाख, भारत संचार निगम पाच लाख, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ५0 लाख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सात लाख, दि वाशिम जिनिंग अँण्ड को-ऑप. प्रेसिंगकडे २२ लाख, कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभागाकडे दीड लाख असे एकूण २ कोटी १७ लाख ५0 हजार रुपये थकबाकी आहे.