‘बेटी बचाओ’ अभियानासाठी मिळाला २४ लाखांचा निधी
By Admin | Updated: April 29, 2016 02:09 IST2016-04-29T02:09:29+5:302016-04-29T02:09:29+5:30
गतवर्षी मिळाला नव्हता निधी; जनजागृती करणार.

‘बेटी बचाओ’ अभियानासाठी मिळाला २४ लाखांचा निधी
वाशिम: गतवर्षी बेटी बचाओ अभियानासाठी एक रुपयाचाही निधी मिळाला नव्हता. मात्र, यावर्षी या अभियानासाठी २४ लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. राज्यात दहा जिल्ह्यांमध्ये बेटी बचाओ अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये विदर्भातील बुलडाणा व वाशिमचा समावेश आहे. या अभियानांतर्गत मुलींचा जन्मदर वाढविण्याकरिता जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे. गतवर्षी बेटी बचाओ मोहीम राबविण्याकरिता एक रुपयाचाही निधी देण्यात आला नव्हता. त्यामुळे सदर मोहीम बंद पडते की काय, अशी स्थिती होती. मात्र, २0१६ -१७ साठी नुकताच २४ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता वर्षभर जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. नुकतेच जिल्हा परिषदेत या अभियानांतर्गत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बेटी बचाओच्या राज्य समन्वयक वर्षा देशपांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आगामी वर्षात या निधीतून समाज उद्बोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये तालुक्यात प्रकल्प स्तरावर महिलांचे मेळावे घेण्यात येईल. या मेळाव्यांमध्ये आरोग्यसेविका, अंगणवाडीसेविका, महिला कर्मचार्यांचा समावेश असणार आहे. तसेच ह्यएफएमह्णवर जाहिरात, गावांमध्ये विविध ठिकाणी फलक लावूनही प्रचार करण्यात येणार आहे. जागतिक महिलादिनी एकच मुलगी असलेल्या महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे.