२४ तासांत वीज जोडणीचा निर्णय हवेतच विरला!
By Admin | Updated: May 15, 2017 01:25 IST2017-05-15T01:25:09+5:302017-05-15T01:25:09+5:30
ग्राहकांची गैरसोय थांबेना : अर्ज करूनही मिळत नाही ‘कनेक्शन’

२४ तासांत वीज जोडणीचा निर्णय हवेतच विरला!
लोकमत न्यूज नेटवर्क
देपूळ : नवीन वीज जोडणी घ्यायची असेल, तर किमान सहा महिने लागतात. या किचकट प्रक्रियेला फाटा देत महावितरणने २४ तासांत वीज जोडणी देण्याचा उपक्रम हाती घेतला होता. मात्र, तो हवेतच विरला असून, तांत्रिक अडचणींचे कारण समोर करून ‘कनेक्शन’ देण्यास विलंब लागत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘मोबाइल अॅप’ आणि ‘आॅनलाइन’ प्रक्रियेचा आधार घेत जिल्ह्यातील वाशिम आणि कारंजा येथून या उपक्रमास सुरुवात करण्यात आली होती. यानुसार, ग्राहकांना वीज मागणी अर्ज देण्याची गरज नाही. अर्ज आॅनलाइन तथा मोबाइल अॅपद्वारे करता येणार आहेत. यामुळे ग्राहकांच्या वेळ व पैशाची बचत होणार आहे, असे महावितरणने जाहीर केले होते. २४ तासांत वीज जोडणी देण्याच्या उपक्रमास प्रायोगिक तत्त्वावर वाशिम व कारंजा शहरातून सुरुवात करण्यात आली होती. वाशिम शहरामध्ये रॉयल प्लाझा डी.पी., राणी लक्ष्मीबाई शाळा, बस स्टॅण्डजवळ, बोरा आॅइल मिल, शेळके हॉस्पिटल, बस स्टँड बुस्टर, गाभणे हॉस्पिटल, माउलीनगर, आंबेडकर चौक, न्यू अल्लाडा प्लॉट, वाशिमकर कॉम्प्लेक्स, पी.डब्ल्यू.डी. आॅफीस, न्यू गव्हाणकरनगर, व्यंकटेश कॉलनी, कलेक्टर आॅफीस, पोल्ट्री फार्म, सिव्हिल लाइन, जवाहर कॉलनी, न्यू आय.यू.डी.पी -१, न्यू आययूडीपी- २, न्यू आययूडीपी - ३, ४, मुजूमदार हाउस, दागडे हॉस्पिटल, कानडे हॉस्पिटल, तहसील आॅफीस, अल्लाडा प्लॉट, तिरुपती सिटी व नंदनवन कॉलनी, सर्किट हाउस, योजना कॉलनी, सुंदर वाटिका, ओरा हॉस्पिटल, दंडे हॉस्पिटल, बाहेती हॉस्पिटल, वाटाणेवाडी, बीसीएच होस्टेल, राधाकृष्णनगर, निकाल होस्टेल आदी ठिकाणी राहणाऱ्या ग्राहकांना २४ तासांत नवीन वीज कनेक्शन दिले जाणार होते. मात्र, मोबाइल अॅप आणि आॅनलाइनविषयी जनजागृतीच नसल्यामुळे या उपक्रमास प्रतिसाद मिळेनासा झाला आहे.
महावितरणने वीज कनेक्शनसाठी ‘मोबाइल अॅप’ आणि ‘आॅनलाइन’ प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्राहकांकडून त्यास प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. कागदोपत्री प्रक्रियेमुळे निश्चितपणे कनेक्शन द्यायला वेळ लागत आहे. ग्राहकांनी याकामी सहकार्य करायला हवे.
- विजय मेश्राम, कार्यकारी अभियंता, महावितरण