कर्जमाफीच्या कक्षेत २0६ लाभार्थी

By Admin | Updated: December 15, 2015 02:02 IST2015-12-15T02:02:56+5:302015-12-15T02:02:56+5:30

सावकारी कर्जमुक्ती; हद्दीबाहेर २८.३१ लाखाचे कर्ज वाटप, ४३ अधिकृत सावकार

206 beneficiaries in debt waiver | कर्जमाफीच्या कक्षेत २0६ लाभार्थी

कर्जमाफीच्या कक्षेत २0६ लाभार्थी

संतोष वानखडे /वाशिम: सावकाराने तालुका हद्दीबाहेर दिलेले सावकारी कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, याचा फायदा जिल्ह्यातील २0६ शेतकर्‍यांना होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात याव्यतिरिक्त सावकारी कर्जाची ६५00 प्रकरणे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २0१४ च्या विधिमंडळ अधिवेशनात शेतकर्‍यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनाप्रमाणे सहकार विभागाने कर्जमाफीचा आदेश काढून त्याची अंमलबजावणीही सुरू केली. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमानुसार सावकाराला त्याच्या परवान्यामध्ये निश्‍चित केलेल्या क्षेत्रामध्येच कर्जवाटप करता येते. एका तालुक्यापुरते र्मयादित क्षेत्र असलेल्या सावकाराचे त्याच तालुक्यातील सावकारी कर्ज या निर्णयाने माफ केले; मात्र त्याच जिल्हय़ातील, परंतु अन्य तालुक्यातील शेतकर्‍यांना वाटप केलेले पीककर्ज पूर्वीच्या निर्णयाने माफ होणारे नव्हते. त्यामुळे जिल्हय़ातील जवळपास २0६ शेतकरी लाभार्थी सावकारी कर्जमाफीपासून वंचित होते. हद्दीबाहेरचे म्हणून गणल्या गेलेल्या २0६ शेतकर्‍यांनी २८ लाख ३१ हजार ७५२ रुपयांचे कर्ज घेतल्याची नोंद उपनिबंधक कार्यालयाच्या दप्तरी आहे. या रकमेचे व्याज ७६ हजार रुपये झाल्याने एकूण सावकारी कर्जाची रक्कम २९ लाख सात हजार ७५२ रुपये, अशी झाली. जिल्हय़ात ४३ परवानाधारक सावकार असून, २0१४ मध्ये ९१७८ कर्जदार सभासदांना १0 कोटी ५0 लाखांचे कर्जवाटप केले होते. सावकारी कर्जमाफीची घोषणा शासनाने केल्यानंतर जवळपास ६५00 अर्ज उपनिबंधक कार्यालयाला प्राप्त झाले होते. या अर्जांची छाननी करून सावकारी कर्जमाफीची प्रकरणे निकाली काढण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे. नेमून दिलेल्या तालुक्यातील सावकाराने त्याच तालुक्यातील शेतकर्‍याला कर्ज दिले असेल तर ते माफ होणारे आहे. २0१५ मधील नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात तालुक्याच्या हद्दीबाहेरचे सावकारी पीककर्जही माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने आता जिल्हय़ातील अशा शेतकर्‍यांनाही सावकारी कर्जमाफीचा लाभ होण्याच्या आशा पल्लवित झाल्या.

Web Title: 206 beneficiaries in debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.