२. ५३ कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर
By Admin | Updated: March 19, 2015 01:40 IST2015-03-19T01:40:19+5:302015-03-19T01:40:19+5:30
वाशिम जिल्हा परिषद; ग्रामीण भागासाठी भरीव तरतूद.

२. ५३ कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर
वाशिम : जिल्हा परिषदेच्या १८ मार्चला झालेल्या सर्वसाधारण सभेत जि. प. उपाध्यक्ष तथा अर्थ समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दोन कोटी ५३ लाख ९३ हजार ८१४ रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला आणि तो सभागृहात एकमताने मंजूरही झाला. जिल्हा परिषद अध्यक्ष सोनाली जोगदंड, शिक्षण सभापती चक्रधर गोटे, महिला व बालकल्याण सभापती ज्योती गणेशपुरे, कृषी व पशु संवर्धन सभापती हेमेन्द्र ठाकरे, समाजकल्याण सभापती पानुबाई जाधव, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डी. ए. वानखेडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी डी. के. हिवाळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सभेच्या सुरुवातीला जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित आजी व माजी जिल्हा परिषद सदस्य आणि विभाग प्रमुख यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी सविस्तर अर्थसंकल्प सादर केला. आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच ५ कोटी रुपये व्याजापोटी जिल्हा परिषदेला मिळाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जि. प. शाळेच्या इमारत दुरुस्तीसाठी २0 लाख रुपये, समाजकल्याण अंतर्गत योजनांसाठी १ कोटी ५६ लाख, दुर्धर आजारासाठी १0 लाख रुपये, महिला व बाल कल्याण विभागासाठी (चालु व पुढील वर्षाचे मिळुन) १ कोटी १0 लाख रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात केली असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. त्याचप्रमाणे आदिवासी व अपंगांना सायकली वाटप, गुरांचे प्रदर्शन, साप व श्वानदंश लसीकरिता, पाणी शुध्दीकरणाकरिता या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली. विभागीय स्पर्धांकरिता १२ लाख तरतूद केली. दरवर्षी प्रत्येक जिल्हा परिषदेच्यावतीने अधिकारी व कर्मचार्यांच्या जिल्हा व विभागस्तरीय स्पर्धा होतात. याचा खर्च त्या-त्या कर्मचार्यांच्या पगारातून केल्या जात होता. पुढील (सन २0१५-१६) मध्ये वाशिम येथे होणार्या विभागीय क्रीडा स्पर्धेच्या खर्चासाठी १२ लाख एवढी तरतूद करण्यात आली आहे. याबाबतचा ठराव खुद्द चंद्रकांत ठाकरे यांनीच मांडला होता. त्याला उपस्थित सदस्यांनी एकमतांनी मंजुरी दिली.