१९ ग्रामसेवकांची वेतनवाढ थांबवली!
By Admin | Updated: May 25, 2016 01:45 IST2016-05-25T01:45:00+5:302016-05-25T01:45:00+5:30
शौचालयाच्या कामात कुचराई केल्याप्रकरणी वाशिम व मंगरूळपीर तालुक्यातील १९ ग्रामसेवकांची वेतनवाढ रोकली.

१९ ग्रामसेवकांची वेतनवाढ थांबवली!
वाशिम: स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत सन २0१५-१६ मध्ये शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट गाठण्यात अपयशी ठरलेल्या जिल्ह्यातील वाशिम व मंगरुळपीर तालुक्यातील १९ ग्रामसेवकांची वेतनवाढ तात्पुरत्या स्वरुपात थांबविण्यात आली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी दिली. स्वच्छ भारत मिशनच्या कामात कुचराई करणार्या व एका वर्षात ५0 टक्क्यांपेक्षा कमी उद्दिष्ट गाठणार्या ग्रामसेवकांची एप्रिल २0१६ पासून पुढील वेतनवाढीवर परिणाम न होता एका वर्षाची वेतनवाढ तात्पुरत्या स्वरुपात थांबविण्यात आली आहे; मात्र दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणार्या ग्रामसेवकांची वेतनवाढ सुरु करण्यात येणार असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी याबाबत मागील एका बैठकीत सर्व गटविकास अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या. त्यानंतर वाशिम व मंगरुळपीर तालुक्यातील गटविकास अधिकार्यांनी ही कारवाई केली. उर्वरित तालुक्यातही ही प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.