१८२५ कोरोना बाधित गृह विलगीकरणात; ४२७ रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:37 IST2021-04-05T04:37:03+5:302021-04-05T04:37:03+5:30
जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या ११६६ आणि शहरी भागात ११३३ असे एकूण २२९९ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील १८२५ रुग्ण ...

१८२५ कोरोना बाधित गृह विलगीकरणात; ४२७ रुग्णालयात
जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या ११६६ आणि शहरी भागात ११३३ असे एकूण २२९९ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील १८२५ रुग्ण गृह विलगीकरणात; तर उर्वरित ४२७ रुग्णांवर शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. ९१ रुग्ण ‘ऑक्सिजन’वर आणि १० रुग्ण सध्या ‘व्हेंटिलेटर’वर ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, शहरी भागातील गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांवर पाळत ठेवण्याची जबाबदारी नगर परिषद आणि ग्रामीण भागात ही जबाबदारी ग्रामपंचायती, ग्रामस्तरीय समितीवर सोपविण्यात आलेली आहे. विलगीकरणातील सर्व नागरिकांच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’चे शिक्के मारण्यात आले असून घरासमोर ठळक अक्षरात ‘सदर घरामध्ये कोरोना बाधित रुग्ण आहे, प्रतिबंधित क्षेत्र’ असे नमूद असलेली पाटी लावण्यात येत आहे. यासह बाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना गावात फिरण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. बाधितांच्या घरासमोरून शेतशिवारांमध्ये इतरांना जाण्यास मात्र मुभा देण्यात आली आहे.
.....................
गृह विलगीकरण/ संस्थात्मक विलगीकरण
वाशिम - ५९४/६५
मालेगाव - २१६/३४
रिसोड - ५३०/३९
मंगरूळपीर - ३०८/१५
कारंजा लाड - ९९/८
मानोरा - ७८/३०
.............................
९१
‘ऑक्सिजन’वर असलेले कोरोना बाधित
............
१०
‘व्हेंटिलेटर’वर असलेले कोरोना बाधित
...............
बाॅक्स :
सर्वाधिक भरती रुग्ण वाशिम तालुक्यात
जिल्ह्यातील इतर पाच तालुक्यांच्या तुलनेत गृह व संस्थात्मक विलगीकरणात उपचार घेत असलेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या वाशिम तालुक्यात आहे. या तालुक्यातील ग्रामीण भागात ३०७ व शहरी भागात ५३० असे एकूण ८३७ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील ५९४ जण गृह विलगीकरणात; तर ६५ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात भरती आहेत.
.................
कोट :
गृह विलगीकरणातील कोरोना बाधितांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. ठरवून दिलेल्या कालावधीत घराबाहेर पडू नये; अन्यथा गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश आहेत. त्यानुषंगाने शहरी व ग्रामीण भागात चोख नियोजन करण्यात आले आहे.
- डाॅ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम