सर्पमित्रांकडून तीन दिवसांत १५ सापांना जीवदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:44 IST2021-08-22T04:44:14+5:302021-08-22T04:44:14+5:30
वाशिम : वाईल्ड लाईफ कन्झर्व्हेशन टीमच्या सर्पमित्रांनी तीनच दिवसांत विविध ठिकाणी आढळून आलेल्या १५ सापांना सुरक्षित पकडून जंगलात सोडत ...

सर्पमित्रांकडून तीन दिवसांत १५ सापांना जीवदान!
वाशिम : वाईल्ड लाईफ कन्झर्व्हेशन टीमच्या सर्पमित्रांनी तीनच दिवसांत विविध ठिकाणी आढळून आलेल्या १५ सापांना सुरक्षित पकडून जंगलात सोडत जीवदान दिले.
वाईल्ड लाईफ कन्झर्व्हेशन टीमच्या सदस्यांनी गत महिनाभरात ८२ सापांना जीवदान देण्याचे कार्य केले. आता त्यात आणखी १३ सापांची भर पडली आहे. या टीमच्या सर्पमित्र सदस्यांनी कोलार, पेडगाव, मंगरुळपीर, चिस्ताळा, गोगरी आणि मानोरा येथे आढळून आलेल्या सापांना सुरक्षित पकडत जंगलात सोडले. यात मण्यार, नाग आणि घोणस जातीच्या विषारी सापांसह डुरक्या घोणस, कवड्या, धामण, गवत्या, तस्कर आणि पानदिवड जातीच्या बिनविषारी सापांचा समावेश होता. अतुल डापसे, नंदू सातपुते, बुद्धभूषण सुर्वे, अनिकेत इंगळे, आरती इंगोले, दीपक राऊत, कीर्तिराज भगत, अक्षय इंगळे, वैभव सुर्वे, अजय डांगे, राहुल साखरे, प्रतीक टोंचर, विष्णू गावंडे, प्रवीण अंबोरे, उमेश जंगले, राहुल साखरे, सूरज कोंगे, दत्ता साबळे, आदी सर्पमित्रांनी जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांच्या मार्गदर्शनात हे साप पकडले. या संदर्भात वनविभागाला माहिती देण्यात आली आहे.
-----------------
साप आढळल्यास माहिती देण्याचे आवाहन
मंगरुळपीर, मानोरा तालुक्यांसह इतर ठिकाणी मानवी वस्तीत साप आढळून आल्यास लोकांनी सापाला न मारता आणि न डिवचता वाईल्ड लाईफ कन्झर्व्हेशन टीमचे सर्पमित्र अथवा परिसरातील इतर कोणत्याही सर्पमित्रांना याबाबत माहिती द्यावी आणि सापांचा जीव वाचविण्यासह जैवविविधता टिकविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक, तथा पर्यावरण अभ्यासक गौरवकुमार इंगळे, वाईल्डलाईफ कन्झर्व्हेशन टीमचे अध्यक्ष श्रीकांत डापसे आणि उपाध्यक्ष आदित्य इंगोले यांनी केले आहे.