भाव फरकापोटी महाबीजकडून ५९४ बीजोत्पादकांना १.४३ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:15 IST2021-03-13T05:15:25+5:302021-03-13T05:15:25+5:30
महाबीजकडून दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात बीजोत्पादन प्रकल्प राबविला जातो. या प्रकल्पांतर्गत खरीप हंगामात सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी ...

भाव फरकापोटी महाबीजकडून ५९४ बीजोत्पादकांना १.४३ कोटी
महाबीजकडून दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात बीजोत्पादन प्रकल्प राबविला जातो. या प्रकल्पांतर्गत खरीप हंगामात सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांसाठी तर रब्बी हंगामात गहू, हरभरा या पिकांच्या बियाणांसाठी बीजोत्पादन केले जाते. या प्रकल्पांत शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये डिसेंबर ते जानेवारीदरम्यान शेतमालास मिळालेले अधिकाधिक दर गृहीत धरून त्या रकमेच्या २५ टक्के अधिक रक्कम मिळून मोबदला अदा केला जातो. गतवर्षी बाजार समित्यांत शेतमालाचे दर पडल्याने हरभरा बीजोत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्या हमीदरापेक्षाही कमी मोबदला मिळाला होता. त्यात वाशिम जिल्ह्यात तूर, हरभरा आणि करडईचे बीजोत्पादन करणाऱ्या ५९४ शेतकऱ्यांचा समावेश होता. शासन धोरणानुसार बाजार समित्यांत शेतमालाचे दर पडल्यास हमीभाव गृहीत धरून त्यात २५ टक्के अधिक रकमेचा समावेश करून शेतकऱ्यांना फरकाची रक्कम बियाणे महामंडळाला द्यावी लागते. त्यानुसार महाबीजच्या वाशिम जिल्हा व्यवस्थापनाने या शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या १९,१८२ क्विंटल बियाणासाठी फरकाची रक्कम म्हणून एक कोटी ४३ लाख ३१ हजार १७ रुपयांची रक्कम या आठवड्यातच अदा केली आहे.
----
लाभ मिळालेले शेतकरी संख्या
बियाणे शेतकरी
हरभरा ५७९
तूर १४
करडई ०१
-----------------------
कोट : गतवेळच्या खरीप आणि रब्बी हंगामात महाबीजसाठी बीजोत्पादन केलेल्या शेतकऱ्यांना बाजारभाव पडल्याने कमी मोबदला मिळाला होता. शासन धोरणानुसार बीजोत्पादक शेतकऱ्यांना हमीदर आणि महाबीजकडून विकत घेतलेल्या बियाणांच्या मोबदल्यातील फरकाची रक्कम अदा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ५९४ शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण १.४३ कोटी रुपयांची रक्कम फरकापोटी जमा करण्यात आली आहे.
-डॉ. प्रशांत घावडे,
जिल्हा व्यवस्थापक, वाशिम
-------------------------