तीन वर्षांंत लागली १.३९ लाख झाडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2015 23:15 IST2015-05-15T23:15:18+5:302015-05-15T23:15:18+5:30

सामाजिक वनीकरणाचे यश; उन्हाळ्यात झाडांच्या संगोपनासाठी टँकरने पाणी.

1.39 lakh trees in three years! | तीन वर्षांंत लागली १.३९ लाख झाडे!

तीन वर्षांंत लागली १.३९ लाख झाडे!

सुनील काकडे / वाशिम : निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल कायम राखण्याकरिता केवळ वृक्षलागवड करुन चालणार नाही; तर वृक्षांच्या संगोपनावरही अधिक भर द्यावा लागणार आहे. ही बाब लक्षात घेवून सामाजिक वनीकरण विभागाने जिल्ह्यातील रस्त्यांवर गत ३ वर्षांंत प्रत्यक्ष लागवड केलेल्या १,४३,0४७ झाडांपैकी १,३९,१२५ झाडांचे नीट संगोपन करुन ती वाढविली आहेत.
पर्यायी वनक्षेत्र निर्मितीच्या संकल्पनेतून सन १९८२ मध्ये सामाजिक वनिकरण विभागाची निर्मिती झाली. लोकांमध्ये वृक्षांविषयी आवड निर्माण करण्यासाठी सामाजिक वनिकरण विभागातर्फे गट लागवड, रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड, मध्यवर्ती रोपवाटिका, वनमहोत्सव रोपवाटिका, किसान रोपवाटिका, राष्ट्रीय बांबू विकास अभियान, राष्ट्रीय हरितसेना आदी योजना राबविल्या जात आहेत.  
जिल्ह्यात सामाजिक वनिकरणकडून रस्त्याच्या दुतर्फा लागवड करून संवर्धन करण्यात आलेल्या वृक्षांमध्ये गुलमोहर, सिसू, सिरस, कडूनिंब, सिताफळ, करंज, पापडा, कपोक, बिहाडा, चिंच आदींचा समावेश आहे. वाशिम तालुक्यातील वाशिम-अनसिंग, वाशिम- शेलुबाजार, कृष्णा-उकळी, अनसिंग-वाई वारला, वाशिम-तोरनाळा या मार्गांंवर सामाजिक वनिकरण विभागाने वृक्षलागवड करून त्याच्या संवर्धनावर विशेष भर दिला आहे. २00 झाडांमागे १ मजूर याप्रमाणे झाडांची निगा राखणे, काटेरी कुंपन तयार करणे, पाण्याचे नियोजन करणे, आदी कामे केली जातात. यामुळेच अधिकाधिक वृक्ष जगविणे सामाजिक वनिकरणला शक्य झाले आहे.
वाशिम तालुक्यात तांदळी शेवई येथे असलेल्या रोपवाटिकेत विविध झाडांची रोपे तयार केली जातात. रोपांची ४ ते ५ फुट वाढ झाल्यानंतर मागणीनुसार सामाजिक वनिकरणसह इतरही विभागांना त्याचा पुरवठा केला जातो. यानुसार, गेल्या काही वर्षांमध्ये वृक्षलागवडीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Web Title: 1.39 lakh trees in three years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.