शोध मोहिमेत आढळले १३२७ संशयित क्षयरुग्ण; ४ दिवसांत १ लाखाहून अधिक लोकांची तपासणी
By दिनेश पठाडे | Updated: October 7, 2023 13:31 IST2023-10-07T13:30:42+5:302023-10-07T13:31:06+5:30
निदान झालेल्या क्षयरुणांना केंद्र शासनामार्फत त्यांचे उपचार सुरू असेपर्यंत त्यांच्या बँक खात्यात दरमहा ५०० रुपये निक्षय पोषण योजनेंतर्गत पोषण आहारासाठी दिले जाणार आहेत.

शोध मोहिमेत आढळले १३२७ संशयित क्षयरुग्ण; ४ दिवसांत १ लाखाहून अधिक लोकांची तपासणी
वाशिम : : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम राबविली जात आहे. ३ ते ६ ऑक्टोबर या कालावधीत १ लाख ६ हजार ७०५ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये १३२७ संशयित क्षयरुग्ण आढळले. संशयित आढळलेल्या ११ जणांना क्षयरुग्ण आसल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात ३ ते १२ आक्टोबर २०२३ या कालावधीमध्ये अतिजोखमीच्या भागात क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत पथकामार्फत घरोघरी भेटी देऊन सर्व सदस्यांची तपासणी केली जात आहे. या तपासणीमध्ये क्षयरोगाची लक्षणे असलेल्या रुग्णांचे समुपदेशन पथकातील आशा स्वयंसेवीकांमार्फत करून संशयित क्षयरुणांची मोफत थुंकी तपासणी व मोफत एक्स-रे तपासणी जवळच्या शासकीय दवाखान्यात केली जात आहे. यामधून क्षयरोगाचे निदान झालेल्या क्षयरुणांना त्वरीत मोफत औषधोपचार सुरू केला जात आहे.
निदान झालेल्या क्षयरुणांना केंद्र शासनामार्फत त्यांचे उपचार सुरू असेपर्यंत त्यांच्या बँक खात्यात दरमहा ५०० रुपये निक्षय पोषण योजनेंतर्गत पोषण आहारासाठी दिले जाणार आहेत. या मोहिमेंतर्गत अतिजोखमीच्या शहरी भागातील ३६ हजार ९५० व ग्रामीण भागातील १ लाख १३ हजार ७६ लोकसंख्येच्या घरांना भेटी देऊन १ लक्ष ५० हजार २६ लोकसंख्येची पथकाद्वारे तपासणी करण्याचा निश्चिय करण्यात आला आहे. सुरुवातीच्या चार दिवसांत १ लाखांवर व्यक्तींची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग विभागाकडून देण्यात आली. दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीचा खोकला, दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीचा ताप, वजनात लक्षणीय घट होणे, भूक मंदावणे, मानेवर गाठी येणे व थुंकीद्वारे रक्त पडणे अशा प्रकारची लक्षणे असलेल्या संशयित क्षयरुग्णांनी स्वतःहून पुढे येऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश परभनकर यांनी केले आहे.