बारावी परीक्षा रद्द; पदवी, अन्य प्रवेश कसे होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:29 IST2021-06-05T04:29:16+5:302021-06-05T04:29:16+5:30
दहावीनंतर साधारणत: मुले तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अभ्यासक्रमांना अथवा ११वीला प्रवेश घेतात; तर बारावीनंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषीच्या अभ्यासक्रमांना प्रवेश ...

बारावी परीक्षा रद्द; पदवी, अन्य प्रवेश कसे होणार?
दहावीनंतर साधारणत: मुले तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अभ्यासक्रमांना अथवा ११वीला प्रवेश घेतात; तर बारावीनंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषीच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यास पसंती देतात. काही विद्यार्थी बी.ए., बी. काॅम. अथवा विज्ञान विषय निवडून पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यास प्राधान्य देतात. दरम्यान, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आधी दहावीची आणि आता बारावीची परीक्षाही रद्द झालेली आहे. त्यामुळे पुढील अभ्यासक्रमांना नेमका प्रवेश कसा मिळणार, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. मुले अकरावी, बारावीत असताना त्यांना पुढील अभ्यासक्रमांमध्ये पारंगत करण्यासाठी अस्तित्वात असलेले कोचिंग क्लासेसचे संचालकही अडचणीत सापडले आहेत. शासनाने या संदर्भात निर्माण झालेला गोंधळ दूर करावा, अशी मागणी सर्वच स्तरांतून होत आहे.
....................
(बॉक्स)
बारावीनंतरच्या संधी
बारावीनंतर विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य आणि विज्ञान पदवीसोबतच असंख्य क्षेत्रांत करिअर करण्याची संधी उपलब्ध होते. बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. एम.ई., एम.टेक., एम.बी.ए.चे शिक्षण पूर्ण करून करिअरला एका वेगळ्या उंचीवर नेता येते. यासह एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस हे आरोग्यविज्ञान अभ्यासक्रमांना ठरावीक पात्रता प्रवेश परीक्षा देऊन प्रवेश मिळविता येतो. त्यातून भविष्याला आकार देणे शक्य होते.
....................
प्राचार्य म्हणतात...
दहावीपाठोपाठ बारावीची परीक्षाही रद्द करण्यात आली. या निर्णयामुळे अभ्यासात हुशार असलेल्या विद्यार्थ्यांचे निश्चितपणे मोठे नुकसान झाले आहे. पुढे काय, हा प्रश्नही त्यांच्यासमोर उभा आहे. असे असले तरी संसर्गाची तिसरी लाट येणार, हे गृहीत धरून घेतलेला हा निर्णय योग्यच आहे.
- बाळासाहेब गोटे
.............
बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे करिअर घडविता येते. मात्र परीक्षाच रद्द झाल्याने त्यांच्या आकांक्षांवर पाणी फेरले आहे. मात्र शिक्षणापेक्षाही आरोग्य महत्त्वाचे असून कोरोना संसर्गापासून मुलांच्या बचावाकरिता शासनाने उचललेले पाऊल योग्यच आहे.
- विनोद नरवाडे
.......................
विद्यार्थी म्हणतात...
बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून अभियांत्रिकीच्या शिक्षणाला प्रवेश मिळविण्याचे स्वप्न मी बाळगले होते. मात्र आता परीक्षाच रद्द झाल्याने पुढे काय होणार, हा प्रश्न उभा ठाकला आहे.
- विष्णू तायडे
...................
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे शिक्षणाची पुरती वाताहत झाली आहे. ऑनलाईन पद्धतीने मिळालेल्या शिक्षणातून बारावीच्या परीक्षेची जय्यत तयारी केली होती; मात्र आता परीक्षाच रद्द झाल्याने मेहनतीवर पाणी फेरले आहे.
- मंगेश थोरात
.................
पालक म्हणतात...
मुलांचे भविष्य घडविण्यासाठी पालक अहोरात्र परिश्रम करतात. बारावीचे वर्ष हे शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे; मात्र परीक्षाच रद्द झाल्याने पुरता गोंधळ उडाला आहे. असे असले तरी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय योग्यच आहे.
- अभिमान चव्हाण
........................
शिक्षण हे महत्त्वाचे आहेच; पण त्याहीआधी मुले सुरक्षित राहणे सर्वाधिक गरजेचे आहे. बारावीची परीक्षा रद्द झाल्याने निश्चितपणे मुलांचे नुकसान होणार आहे; मात्र कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणार आणि त्यात मुले बाधित होणार असल्याचे गृहीत धरून घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे.
- शिवाजी थोरात
......................
जिल्ह्यात बारावीतील एकूण विद्यार्थी
१८,१७५
मुले - ९,७२५
मुली - ८,४५०