पहिली ते आठवीचे १.२५ लाख विद्यार्थी विनापरीक्षा पास १४७७५ विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:40 IST2021-04-06T04:40:43+5:302021-04-06T04:40:43+5:30
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री गायकवाड ...

पहिली ते आठवीचे १.२५ लाख विद्यार्थी विनापरीक्षा पास १४७७५ विद्यार्थी
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री गायकवाड यांनी केली आहे. कोरोना प्रादुर्भाव वाढल्यामुळे आपण ऑनलाईन शिक्षणावर भर दिला. विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी आपण विविध माध्यमातून प्रयत्न करत होतो. पण आता कोरोनाची परिस्थिती पाहता आता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश देणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाशिम जिल्ह्यातील पहिली ते पाचवी पर्यंतचे ७३ हजार ७७५, तर सहावी ते आठवीपर्यंत ५१ हजार ९१२ विद्यार्थी मिळून एकूण १ लाख २५ हजार ६८७ विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. पहिली ते आठवीचे जे विद्यार्थी आहेत, आरटीईच्या अंतर्गत म्हणजे मोफत शिक्षण अधिकाराच्या कायद्यांतर्गत, खरेतर या मुलांचे वर्षभराचे मूल्यमापन बघितले पाहिजे, परंतु यंदाची परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे, त्यामुळे यंदा हे होणे शक्य नाही. म्हणून पहिली ते आठवी इयत्तेमधील विद्यार्थी आहेत, शिक्षण हक्क अधिकाराच्या अंतर्गत जे विद्यार्थी येतात, त्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करून त्यांना पुढील इयत्तेत पाठवण्यात येत असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.
------------------------
जिल्ह्यातील विद्यार्थी
वर्ग - विद्यार्थी संख्या
पहिली --------------- १४८८५
दुसरी --------------- १४६६५
तिसरी --------------- १४७३०
चौथी --------------- १४७२०
पाचवी --------------- १४७७५
सहावी --------------- १७३०४
सातवी --------------- १७०००
आठवी --------------- १७६०८
---------------
कोट : गेल्या वर्षभरापासून आमचा पाल्य ऑनलाईन शिक्षणाचे धडे गिरवीत आहे. शाळेतून दिला जाणारा अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर त्याने नियमित भर दिला. आता परीक्षा तोंडावर असताना शालेय शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना विनापरीक्षा पास करून पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. कोरोना पार्श्वभूमीवर हा निर्णय समाधानकारक वाटतो.
-संगीता गायकवाड, महिला पालक
----------------
कोट : कोरोना संसर्गामुळे वर्षभर ऑनलाईन शिक्षणावर शिक्षण विभागाने भर दिला. त्यात आमचा पाल्य सहाव्या वर्गात असताना त्याने शिक्षकांनी दिलेला गृहपाठ नियमित पूर्ण केला. ऑनलाईन क्लास केले. आता परीक्षेसाठी त्याची तयारी झाली असताना शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचे ठरविले. हा निर्णय चांगला असला तरी ऑनलाईन परीक्षा घ्यायला हव्या होत्या.
-गणेश ठाकरे, पालक
-------------
कोट : आमचा पाल्य पाचवीत असून, तो वर्षभरापासून ऑनलाईन शिक्षणाचे धडे गिरवित आहे. शाळेतून दिलेला अभ्यासक्रम त्याने पूर्ण करण्यावर भर दिला. आता शालेय शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना विनापरीक्षा पास करून पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय चांगला असला तरी विद्यार्थ्यांची प्रगती नेमकी कळणार नाही. त्याचे मूल्यमापन होणार नाही.
- सारिका पवार, महिला पालक
----------------
कोट : शालेय शिक्षण विभागाचा पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय पूर्णपणे योग्य आहे असे म्हणता येणार नाही. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाईन परीक्षा घेणे योग्य नसले तरी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्या, तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे मूल्यमापन होऊ शकेल, परंतु परीक्षा न घेताच पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय म्हणजे पुढे विद्यार्थी आळशी बनून त्यांची शैक्षणिक प्रगती खुंटू शकते.
-अरुण इंगळे, माजी प्राचार्य
-----------------
कोट : शिक्षण विभागाचा निर्णय वरकरणी चांगला दिसतो, परंतु हा निर्णय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस मारक आहे. विद्यार्थी ऑनलाईन अभ्यास करीत असताना त्याचे नेमके काय परिणाम झाले, ऑनलाईन अभ्यास करताना त्यांना अभ्यासक्रमात काही अडचणी आल्या का, त्यांचा पाठ्यक्रम पूर्ण झाला आहे का, हे पुढच्या वर्गात विना परीक्षा प्रवेश दिल्याने कळणार नाही. त्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी पर्यायाचा विचार करायला हवा.
-बाळासाहेब दहातोंडे,
माजी गटशिक्षणाधिकारी