१२० गावे ‘वॉटर न्यूट्रल’!
By Admin | Updated: May 15, 2017 01:32 IST2017-05-15T01:32:07+5:302017-05-15T01:32:07+5:30
‘जलयुक्त शिवार’ची फलनिष्पत्ती : जलसंधारणाच्या कामांना गती

१२० गावे ‘वॉटर न्यूट्रल’!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये २०० आणि २०१६-१७ मध्ये १४९ अशा ३४९ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची विविध कामे करण्यात आली. त्याची फलनिष्पत्ती म्हणून २०१६-१७ मध्ये १५१; तर चालूवर्षी जवळपास १२० गावांची पाण्याची गरज पूर्ण झाल्याने या गावांचा ‘वॉटर न्यूट्रल’मध्ये समावेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दर दोन वर्षांनी उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सन २०१५-१६ पासून जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. अभियानाच्या पहिल्या दोन वर्षांत ३४९ गावांमध्ये याअंतर्गत विविध कामे पूर्ण करण्यात आली. त्यात नाला सरळीकरण, खोलीकरण, रुंदीकरण, पाणलोट विकासाची कामे, साखळी सिमेंट नालाबांधाचे खोलीकरण, जुन्या जलसंरचनांचे पुनरुज्जीवन, कोल्हापुरी पद्धतीच्या व साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती, पाझर तलाव, लघुसिंचन तलाव दुरुस्ती, नूतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करणे, पाझर, गाव, साठवण, शिवकालीन, ब्रिटिशकालीन आणि निजामकालीन तलावातील माती व नालाबांधातील गाळ काढणे, मध्यम प्रकल्पांच्या सिंचन क्षमतेनुसार प्रत्यक्ष वापर होण्यासाठी उपाययोजना करणे, छोटे ओढे, नाले जोड प्रकल्प राबविणे, विहीर, बोअरवेल पुनर्भरण, पिण्याच्या पाण्याचे स्रोत तसेच पाणी वापर संस्थाचे बळकटीकरण, आदी कामे यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.
जलसंधारणाच्या या कामांचा सकारात्मक परिणाम झाला असून, गतवर्षी १५१ गावांची पाण्याची गरज पूर्ण करण्यात प्रशासनाला यश मिळाले; तर यंदा हा आकडा १२० गावांपेक्षा अधिक होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. २०१७-१८ या वर्षांत पुन्हा १२० गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची विविध कामे प्रस्तावित करण्यात आली असून, निधी प्राप्त होताच ही कामे सुरू केली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पाण्याची गरज पूर्ण झाल्यास गावाचा ‘वॉटर न्यूट्रल’मध्ये होतो समावेश
शेती प्रयोजनाकरिता लागणाऱ्या पाण्यासह जनावरे, गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्याकरिता जलयुक्त शिवार अभियानातून गावागावांत जलसंधारणाची कामे केली जात आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून सर्वेक्षण करण्यात येऊन पाण्याची गरज पूर्ण झाल्याची शहानिशा केली जाते. त्यानंतरच संबंधित गावाचा ‘वॉटर न्यूट्रल’मध्ये समावेश केला जातो. ज्यावर्षी ‘वॉटर न्यूट्रल’मध्ये समावेश झाला, त्यावर्षी गावात जलसंधारणाच्या कुठल्याच कामाला मंजुरी दिली जात नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील २०० गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. या गावांमध्ये जलसंधारणाची ४ हजार ९०६ कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे ३० हजार ५३३ टीसीएम पाणीसाठा साठवण क्षमता निर्माण झाली आहे. तसेच सन २०१६-१७ मध्ये १४९ गावांमध्ये आतापर्यंत ११०० पेक्षा अधिक कामे पूर्ण झाली असून, यामुळे ७ हजार ३३४ टीसीएम पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. जुन्या कामांपैकी १७९ कामे प्रगतीपथावर असून, ही कामेही लवकरच पूर्ण होतील.
- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी, वाशिम