शौच्छालयासाठी मिळणार १२ हजाराचे अनुदान
By Admin | Updated: November 12, 2014 23:19 IST2014-11-12T23:19:27+5:302014-11-12T23:19:27+5:30
स्वच्छ भारत मिशन : शौच्छालय बांधण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन.

शौच्छालयासाठी मिळणार १२ हजाराचे अनुदान
वाशिम : केंद्र व राज्य स्तरावर राबविण्यात येत असलेल्या निर्मल भारत अभियानाचे २ ऑक्टोंबर २0१४ पासुन स्वच्छ भारत मिशन असे नामाकरण करण्यात आले असून गावातील कुटुंबांनी शौचालय बांधुन त्याचा नियमित वापर केल्यास त्यांना १२ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. सायखेडा येथील संगिता आव्हाळे यांनी मंगळसुत्र विकुन घरी शौचालय बांधल्यानंतर राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी संगिता यांना मंगळसुत्र देऊन गौरव केला होता. तेंव्हा शौचालयाचे प्रोत्साहन अनुदानाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानुसार ७ नोव्हेंबरला शासनाने एका परिपत्रकाद्वारे प्रोत्साहन अनुदानाची रक्कम १२ हजार रूपये केले असल्याचे सर्व जिल्हा परिषदांना कळविले आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील सायखेडा गावा तील संगिता आव्हाळे या महिलेने शौचालयासाठी आपले मंगळसुत्र व इतर सोन्याचे दागिने विकले. जिल्हा परिषदेने या घटनेला सर्व वर्तमानपत्रात प्रसिद्धी दिली. ही स्टोरी टी. व्ही. चॅनलने लावुन धरल्यानंतर केंद्र व राज्य शासनाने याची दखल घेतली. यानिमित्ताने मग शौचालय अनुदान वाढविण्याचा मुद्दा पुढे आला. नंतर शासनाने एक परिपत्रक काढुन शौचालय बांधुन वापर करणार्या कुटुंबांना १२ हजार रुपये देण्यात येणार असल्याचे जाहिर केले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षा .सोनाली जोगदंड यांनी स्वच्छ भारत मिशन या महत्वाकांक्षी कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचे स्पष्ट करून जिल्हावासीयांनी या अभियानाला उत्स्फरुत प्रतिसाद दिला असल्याचे सांगीतले. शौच्छालयाच्या वाढलेल्या अनुदानामुळे शौच्छालयांचे बांधकाम करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे त्यांने स्पष्ट केले.