दुर्धर आजारग्रस्तांचे १0५ प्रस्ताव रखडले
By Admin | Updated: December 14, 2015 02:30 IST2015-12-14T02:30:21+5:302015-12-14T02:30:21+5:30
गंभीर आजारातही वाशिम जिल्हा परिषद प्रशासनाकडून रुग्णांची थट्टा.

दुर्धर आजारग्रस्तांचे १0५ प्रस्ताव रखडले
संतोष वानखडे / वाशिम : दुर्धर आजारात शासनाकडून १५ हजारांची मदत मिळण्यासाठी १0५ रुग्ण लाभा र्थ्यांनी सादर केलेले प्रस्ताव आरोग्य विभागाच्या लालफीतशाहीत अडकले आहेत. गंभीर आजारातही प्रशासन थट्टा करीत असल्याने रुग्णांची डोकेदुखी वाढली आहे. नानाविध कारणांमुळे मानवाला विविध प्रकारचे दुर्धर आजार जडत आहेत. गोरगरीब रुग्णांना कर्करोग, हृदयरोग, किडनीचा विकार यांसारख्या दुर्धर आजारांवरील उपचाराचा खर्च झेपावणारा नसल्याने शासनाने सरकारी दवाखान्यांची सुविधा उपलब्ध केली. याबरोबरच गोरगरीब रुग्णांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून १५ हजारांचे आर्थिक साहाय्यदेखील दिले जाते. राज्य शासनाने नमूद केलेल्या रुग्णालयात उपचार घेतलेल्या कर्करोग, हृदयरोग व किडनीग्रस्त रुग्णांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर साधारणत: एका महिन्याच्या आ त या प्रस्तावाची पडताळणी आणि मंजुरात या प्रशासकीय बाबी पूर्ण होणे अपेक्षित आहे. मार्च ते सप्टेंबर २0१५ या सात महिन्यांत आरोग्य विभागाकडे एकूण १६८ प्रस्ताव प्राप्त झाले. प्राधिकृत दवाखाना नसणे, या पूर्वी लाभ घेणे, दुर्धर आजारात न मोडणे, प्रस्ताव आणि उपचार पत्रकावरील नावात तफावत असणे आदी कारणांमुळे ६३ प्रस्ताव छाननीत बाद झाले. परिणामी, १0५ प्रस्तावांना मंजुरात देऊन दुर्धर आजाराशी संघर्ष करणार्या रुग्णांना १५ हजारांची मदत तातडीने मिळणे अपेक्षित होते; मात्र डिसेंबरच्या दुसर्या आठवड्यापर्यंंतही हे प्रस्ताव लालफीतशाहीत ठेवून प्रशासनाने दुर्धर आजारग्रस्तांची जणू थट्टाच मांडली. पात्रता यादीत वाशिम तालुक्यातील ३१, मंगरुळपीर १८, मानोरा १७, मालेगाव १६, रिसोड १५ आणि कारंजा तालुक्यातील आठ प्रस्तांवाचा समावेश आहे. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या एकूण ५७ रुग्णांनी प्रस्ताव सादर केले. याप्रमाणेच ३0 हृदयरुग्ण आणि किडनीचा विकार जडलेल्या १८ रुग्णांनी आरोग्य विभागाची मदत मिळावी, यासाठी प्रस्ताव सादर केले. कर्करोग, हृदयरोग व किडनी विकार यांसारख्या गंभीर आजारांशी धैर्याने दोन हात करणार्या या रुग्णांना जिल्हा परिषदेकडून मानसिक व आर्थिक आधार मिळण्याऐवजी, त्यांच्यावर प्रस्तावांच्या मंजुरासाठी जिल्हा परिषदेच्या पायर्या झिजविण्याची वेळ आली.