आरोग्य केंद्रांना लसीचे १० हजार डोस वितरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:39 IST2021-04-25T04:39:47+5:302021-04-25T04:39:47+5:30
वाशिम : कोरोना प्रतिबंधक लसीचे १० हजार डोस शुक्रवारी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना वितरीत केले असून, आणखी दोन ...

आरोग्य केंद्रांना लसीचे १० हजार डोस वितरीत
वाशिम : कोरोना प्रतिबंधक लसीचे १० हजार डोस शुक्रवारी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना वितरीत केले असून, आणखी दोन दिवसात डोस प्राप्त होणार आहेत.
कोरोना विषाणू संसर्गाने जनजीवन प्रभावित झाले आहे. गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. वाशिम जिल्ह्यात गतवर्षी जुलै व सप्टेंबर या दोन महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली होती. फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचा आलेख वाढल्याने सर्वांचीच चिंताही वाढली. कोरोनाच्या या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेलाही गती देण्यात येत आहे. परंतु, मागणीच्या तुलनेत लसीचे डोस प्राप्त होत नसल्याने ग्रामीण भागातून नाराजीचा सूर उमटत आहे. सुरुवातीला कोरोना प्रतिबंधक लसीबाबत नागरिकांमध्ये गैरसमज असल्याने लसीकरणाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. आता मात्र रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस घेण्याकडे नागरिकांची कल वाढला आहे. गत दोन दिवसात लसीचे १० हजार डोस जिल्ह्यात प्राप्त झाले असून, ग्रामीण भागातील मागणीचा विचार करता प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना लसीचे डोस वितरीत करण्यात आले. दोन दिवसात आणखी काही डोस प्राप्त होणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
बॉक्स
प्राथमिक आरोग्य केंद्र गजबजले
जिल्ह्यातील आरोग्यवर्धिनी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. लसीकरणासाठी यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांची गर्दी होत होती. गत दोन दिवसांपूर्वी लसीचा तुटवडा असल्याने काही प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्रातील लसीकरण प्रभावित झाले होते. त्यामुळे नागरिकांची गर्दीही ओसरली होती. आता लसीचे १० हजार डोस उपलब्ध झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र पुन्हा गजबजले आहेत.
०००००
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे १० हजार डोस प्राप्त झाले असून, प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर केंद्रांना लसीचे वितरण करण्यात आले. कोरोना लस ही पूर्णत: सुरक्षित असून, पात्र नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी.
-डॉ. मधुकर राठोड
जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम