जि.प.च्या ८३ शाळांमधील १00 वर्गखोल्या चकाकणार!
By Admin | Updated: March 5, 2016 02:39 IST2016-03-05T02:39:09+5:302016-03-05T02:39:09+5:30
शिक्षण विभागाचा पुढाकार : बांधकामाला सुरुवात; सव्वा पाच कोटींचा निधी.

जि.प.च्या ८३ शाळांमधील १00 वर्गखोल्या चकाकणार!
वाशिम: गत दोन वर्षांंपासून बांधकामाच्या प्रतीक्षेत असलेल्या ८३ शाळेच्या १00 वर्गखोल्यांच्या बांधकामाला सुरुवात झाल्याने अध्ययन-अध्यापक प्रक्रियेतील अडथळा संपुष्टात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक अशा एकूण ७७९ शाळा असून, येथे शिक्षण दिले जाते. अनेक शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात वर्गखोल्या नाहीत तसेच काही शाळांच्या वर्गखोली वादळवारा व अवकाळी पावसाने जमीनदोस्त केल्या. परिणामी, दोन-तीन वर्गातील विद्यार्थ्यांंना एका वर्गखोलीत बसविण्याची वेळ शिक्षकांवर आली. हिवाळा व उन्हाळ्यात विद्यार्थ्यांंना शाळेच्या प्रांगणात बसवून शिकवावे लागते. गत दोन वर्षांंपासून ८३ ठिकाणी अशीच ह्यशाळाह्ण भरत आली आहे. जुन्या वर्गखोल्यांची दुरुस्ती आणि नव्याने वर्गखोली मंजूर करण्याचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अनेक वेळा चर्चेत आला होता. जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे आणि शिक्षण समितीने हा प्रश्न शासनदरबारी मांडला. नोव्हेंबर २0१५ मध्ये शासनाने ८३ शाळेच्या १00 वर्गखोली बांधकामाला मंजुरात दिली. जवळपास सव्वा पाच कोटींचा निधी मंजूर झाल्याने वर्गखोली बांधकाम, स्वच्छतागृहे, रखडलेली खोली बांधकाम, नवीन वर्गखोली आदींच्या बांधकामाला आता सुरुवात झाली आहे. वाशिम तालुक्यातील १५, रिसोड १७, मानोरा १0, मंगरुळपीर १३, मालेगाव व कारंजा प्रत्येकी १४ अशा एकूण ८३ शाळेच्या १00 वर्गखोल्यांचा यामध्ये समावेश आहे. अनेक ठिकाणी नव्याने वर्गखोल्या बांधकाम होणार आहे; मात्र काही ठिकाणी जागा उपलब्ध नसल्याने जागा प्राप्त करण्यासाठी चाचपणी सुरू आहे. वर्गखोली बांधकामावर शाळा व्यवस्थापन समिती व गटशिक्षणाधिकार्यांना लक्ष ठेवावे लागणार आहे.