वाशिम : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात जमावबंदी आदेश लागू असून, यामधून शाळेतील शिक्षकांना वगळण्यात आले आहे. कोणताही संभ्रम, गैरसमज न ठेवता प्रशासकीय कामकाज व आॅनलाईन शिक्षणासाठी शिक्षकांची शाळेत १०० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे, असे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने मंगळवारी स्पष्ट केले.जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग विद्यार्थ्यांसाठी बंद करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी तसेच बाजारपेठेत गर्दी होऊ नये म्हणून जमावबंदी आदेश लागू करण्यात आले. दरम्यान, या आदेशामुळे काही शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम, गैरसमज दूर करीत जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, सर्व प्रकारच्या खासगी शैक्षणिक संस्थामधील सर्व शिक्षकांनी कोरोनाविषयक बाबींची खबरदारी घेवून शाळेमध्ये आॅनलाईन शिकवणी व प्रशासकीय कामकाजाकरीता उपस्थित राहणे अनिवार्य आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळेत २५५१ शिक्षक तर पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळेत ३९०१ शिक्षक संख्या आहे. याशिवाय पहिली ते चवथीच्या शाळेतील शिक्षकांनादेखील शाळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे. कोणताही संभ्रम न ठेवता कोरोनाविषयक नियमांचे पालन करीत शिक्षकांनी शाळेत १०० टक्के उपस्थित राहावे, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी रमेश तांगडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी केले.
शिक्षकांची शाळेत १०० टक्के उपस्थिती अनिवार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 19:14 IST