‘त्या’ रस्त्यासाठी १० कोटींच्या निधीला मंजुरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:21 IST2021-02-05T09:21:55+5:302021-02-05T09:21:55+5:30
या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यासाठी गत पाच दिवसांपासून सर्पमित्र अनंता देशमुख यांनी भर रस्त्यातच उपोषण सुरू केले ...

‘त्या’ रस्त्यासाठी १० कोटींच्या निधीला मंजुरी !
या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यासाठी गत पाच दिवसांपासून सर्पमित्र अनंता देशमुख यांनी भर रस्त्यातच उपोषण सुरू केले होते. त्यांच्या उपोषणाला शहरातील सर्वच संघटनानी स्वयंस्फूर्तीने पाठिंबा दिला होता. जोपर्यंत बांधकाम विभाग ठोस लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार उपोषणकर्ते अनंता देशमुख यांनी केला होता. दरम्यान, रविवार, ३१ जानेवारी रोजी तहसीलदार अजित शेलार यांच्या मध्यस्थीने व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनानंतर सर्पमित्र अनंता देशमुख यांनी उपोषण मागे घेतले आहे. गत पाच वर्षांपासून सिव्हील रस्त्यात मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, रस्त्यावरील खड्ड्यांसंदर्भात गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर विविधांगी विनोद रंगत आहेत. रस्त्यावर काही ठिकाणी एक ते दीड फुटापर्यंतचे खड्डे पडले आहेत. यामुळे दुचाकीचालकांना वाहने चालविताना अक्षरश: कसरत करावी लागत आहे. दरम्यान, दहा कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाला तांत्रिक मान्यता मिळाल्याने शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. कालुक्षा बाबा दर्गापासून तर वाशिम नाक्यापर्यंत होणाऱ्या नऊशे चाळीस मीटरच्या रस्त्याच्या कामात दोन्ही बाजूने सिमेंट काँक्रिट रोड, नाली, रस्ता दुभाजक, रस्त्याच्या दोन्ही कडेला पेवर ब्लॉक चार प्रमुख ठिकाणी भूमिगत गटारीची व्यवस्था, रस्त्याच्या मधोमध स्ट्रीट लाईट आदी सर्व सुविधांनी युक्त या रोडची निर्मिती केली जाणार आहे.
(प्रतिनिधी)