जगप्रसिद्ध चित्रकार व वसईचे भूमिपुत्र रॉबि डिसिल्वा यांचे गोव्यात निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 23:45 IST2021-08-28T23:44:31+5:302021-08-28T23:45:09+5:30
एक मनस्वी जगविख्यात चित्रकार व जाहीरात आणि ग्राफिक डिझाइनला भारतीय चेहरा देण्याचा ध्यास सदैव अंगी बाळगणारा काळाच्या पडद्याआड

जगप्रसिद्ध चित्रकार व वसईचे भूमिपुत्र रॉबि डिसिल्वा यांचे गोव्यात निधन
वसई - जगप्रसिद्ध चित्रकार व वसईचे भूमिपुत्र रॉबि जेम्स फ्रान्सिस डिसिल्वा यांचे गोव्यात वृद्धपकाळाने निधन झाले असून मृत्यु समयी ते 91 वर्षाचे होते. दरम्यान अलीकडेच सहा महिन्यांपूर्वी ते वसईतील पापडी येथून गोव्यात आपल्या नातेवाईकांकडे गेले होते तिथं आज 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या पवित्र पार्थिवावर उद्या दि 29 ऑगस्ट रोजी एंजल चर्च काकोडा, वोडलेमोल काकोरा गोवा येथे सकाळी 11 वाजता कोविड नियम व ठराविक नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती वसईतील त्यांना गुरुजागी मानणारे प्रसिद्ध चित्रकार सुभाष गोंधळे यांनी लोकमत ला दिली
सामान्य व भूमिपुत्र रॉबि सरांचा प्रवास थांबला
वसईत पापडी चर्च मागे असलेल्या घरात गरीब, अशिक्षित आईवडिलांच्या पोटी झालेला रॉबीचा जन्म, सावत्र तरीही प्रेमळ असलेल्या आईच्या पंखाखाली गेलेले बालपण, लोकांच्या शेतीवाडी, बागांमध्ये केलेलं काम, गोधडी शिवण्यासारखी कामं, त्यात प्रकृतीची झालेली हेळसांड, शिकण्यासाठी घेतलेले कष्ट, बोरिवलीच्या रेशनिंग ऑफिसमध्ये नोकरी करता करता जे जे स्कुल ऑफ आर्ट मध्ये अर्धवेळ शिक्षण करून महाराष्ट्रात सर्वप्रथम येण्याचा पराक्रम, प्रचंड धडपड करून, अनेक ठिकाणांहून नकारघंटा ऐकून अखेर लंडनला शिकण्यासाठी मिळवलेली शिष्यवृत्ती.
या खडतर प्रवासापासून लंडनमध्ये जॉर्ज बेली, पोल पीच, पीटर वाईल्डबरसारख्या नामवंत ग्राफिक डिझायनर सोबत केलेले काम, कॉर्पोरेट डिझाइन या नव्याने उमलणाऱ्या क्षेत्राच्या पायाभरणीत दिलेले मोलाचे योगदान, बॅचलर सिगरेटसाठी पॅकेजिंग व जाहिरात, नानभाटच्या सेंट पॉल चर्च साठी केलेले काचेवरील स्टेन आर्ट पेंटिंग, आपल्या गावातल्या मुलांना आपण कष्ट करून मिळवलेली कला शिकता यावी यासाठी वसईत कला महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी झोकून देऊन केलेले काम, त्यासाठी करावा लागलेला लाल फितीचा, राजकारणाचा सामना आणि शेवटी त्यात मिळालेले यश असा रॉबी डिसील्वा या काळाच्या पुढे असलेल्या कलाकाराचा प्रवास आज 28 ऑगस्ट 2021 रोजी संपला आहे.
जग ही जिंकून दाखवलं !
अग्रगण्य युरोपियन डिझायनर्सच्या बरोबरीनं काम केलेला, मिलानच्या स्टुडिओ बोजेरीनं आणि लंडनच्या जे. वॉल्टर थॉम्पसन जाहिरात कंपनीनं सन्मानानं बोलावून घेतलेला पहिला आणि एकमेव भारतीय डिझायनर. इंग्लंडच्या राजघराण्याकडून FCSD पदवीनं सन्मानित झालेला एकमेव आशियाई. ज्याने भारतात पॅकेजिंग डिझाइन प्रथम आणलं. ज्याने इंडस्ट्रिअल डिझाइनची सुरुवात केली.जाहिरात व ग्राफिक डिझाइनला भारतीय चेहरा देण्याचा ध्यास घेतला. कला-विद्यापीठ उभं करण्याचं स्वप्न पाहिलं. 1960 च्या दशकाच्या शेवटी भारतात परतला तेव्हाही भारतीय डिझाइन क्षेत्राच्या वीस-पंचवीस वर्षं पुढेच असलेला हा अवलिया कलाकार. 1940-50 च्या दशकातला वसईतला, पैशाने आणि स्वभावानेही एक अत्यंत गरीब, साधा मुलगा ते जागतिक दर्जाचा ग्राफिक डिझायनर, त्यांना मिळालेले सन्मान आणि तरीही अत्यंत साधेपणानं जगलेलं आयुष्य फार मोठं व महान आहे.
तर नवीन पिढीला आपले आदर्श निवडण्यात मदत होण्यासाठी, अशा प्रकाशझोतात नसलेल्या कलाकारांना, कर्तृत्वानं महान असूनही जमिनीशी नाळ टिकवून ठेवलेल्या माणसांना जगासमोर आणण्याचं काम त्यावेळी वसईच्या लेखिका वीणा गवाणकर ह्यांनी आपल्या रॉबीवरील पुस्तक रुपात मांडल आहे अशा या पृथ्वीवर राहिल्यानंतर आता स्वर्गाचं ही सौंदर्य वाढवणाऱ्या अवलिया चित्रकाराला वसईकराकडून भावपुर्ण श्रद्धांजली असे भावोद्गार चित्रकार सुभाष गोंधळे यांनी लोकमतशी बोलताना काढले