विरारमध्ये पिशवीत आढळले महिलेचे मुंडके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2025 10:03 IST2025-03-14T10:01:57+5:302025-03-14T10:03:16+5:30
मांडवी पोलिसांनी महिलेचे मुंडके ताब्यात घेऊन पंचनामा करत गुन्हा दाखल केला आहे.

विरारमध्ये पिशवीत आढळले महिलेचे मुंडके
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- मुंबई अहमदाबाद महमार्गावरील विरारच्या मौजे टोकरे येथील विरार फाट्याकडे जाणाऱ्या रोडवरील पिरकुंडा दर्ग्याच्या पुढे एका बॅगेतील पिशवीत महिलेचे मुंडके गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मांडवी पोलिसांसह पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहायक पोलिस आयुक्त बजरंग देसाई यांनी भेट दिली आहे. मांडवी पोलिसांनी महिलेचे मुंडके ताब्यात घेऊन पंचनामा करत गुन्हा दाखल केला आहे.
गुरुवारी संध्याकाळी एका तरुणांचा ग्रुप मांडवी जवळील शिरवली गावात येथे जात होता. काही तरुण शिरवली येथील पिरकुंडा दर्गाजवळ असलेल्या आडोशाला लघुशंकेसाठी गेले होते. तेथे या तरुणांना एक ट्रॅव्हलिंग बॅग दिसली. त्यांनी बॅग उचकटल्यावर त्यातील एका पिशवीमध्ये महिलेचे मुंडके होते. यामुळे एकच खळबळ उडाली. त्यांनी त्वरित ही बाब स्थानिक मांडवी पोलिसांना कळवली.
मांडवी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता एक रिकामी सुटकेस देखील आढळून आली. त्यात काही वस्तू होत्या. त्यामुळे या महिलेच्या मृतदेहाचे अन्य तुकडे याच परिसरात टाकले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या पोलीस या परिसराचा शोध घेत आहेत. या महिलेची ओळख पटवण्याचे कामही सुरू आहे. या परिसरात शोध घेऊन हत्येचा सुगावा मिळविण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.
ही कवटी महिलेची असून किमान चार ते पाच दिवसांपूर्वी टाकलेली असावी अशी शक्यता मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी वर्तवली.