सूर्या जलसेतूची दुरु स्ती कधी होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 23:52 IST2019-11-03T23:51:59+5:302019-11-03T23:52:33+5:30
जलसंपदा विभागाकडे ग्रामस्थांचे निवेदन : ८ वर्षांनंतरही कालवा दुरूस्ती नाही

सूर्या जलसेतूची दुरु स्ती कधी होणार?
कासा : डहाणू तालुक्यातील भराड येथील सूर्या कालव्याच्या कोसळलेल्या जलसेतुची दुरूस्ती ८ वर्षांनंतरही करण्यात आलेली नाही. या बाबत जलसंपदा विभागाकडे येथील ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे.
तालुक्यातील भराड येथे ८ वर्षांपूर्वी सूर्या कालव्याचा जलसेतु उन्हाळ्यात ऐन हंगामात कोसळला होता. त्यामुळे भराड गावातील सुतारपाडा, नवापाडा, पारसपाडा, पाटीलपाडा, लोहारपाडा या पाच पाड्यातील शेतकऱ्यांच्या कालव्याच्या पाण्यावर लागवड केलेल्या भात शेतीचा पाणीपुरवठा बंद झाल्याने शेतकऱ्यांचे पीक वाया जाण्याचा भीतीने जलसंपदा विभागाने तत्काळ लोखंडी सळईचा आधार देऊन तात्पुरती पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा सुरू केला. मात्र जलसेतुची दुरूस्ती केली नाही. त्यामुळे दोन वर्षांनी जलसेतुचा तुटलेला भाग कोलमडून पडला आणि सर्व पाईपलाईन तुटून कोसळली. त्यामुळे येथील कालव्याचा पाणीपुरवठा बंद आहे. या जलसेतूच्या आधारासाठी दिलेले लोखंडी खांबही वाकून गेले आहेत. दरम्यान, ८ वर्षांनंतरही कोसळलेल्या कालव्याची दुरु स्तीच न केल्याने येथील शेतकºयांना पाणी पुरवठा होत नाही.
जलसेतु नादुरूस्त आहे. त्यामुळे कालवा आहे पण पाणी नाही. आम्हाला उन्हाळ्यात शेती करता येत नाही त्यामुळे रोजगारासाठी बाहेर गावी जावे लागते.
- सुदाम गोंड, शेतकरी
जलसेतु दुरुस्ती बाबत ग्रामपंचायत ठराव व निवेदन जलसंपदा विभागाकडे दिले आहे. मात्र त्याची अद्याप दुरु स्ती करण्यात आली नाही. - सुहास पारध, ग्रामस्थ, भराड