विश्वनाथ पाटील यांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 04:13 IST2019-04-02T04:13:17+5:302019-04-02T04:13:42+5:30
उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसची सर्व पदे सोडली : समिती नेमली, ३ दिवसांत भूमिका घेणार

विश्वनाथ पाटील यांचा राजीनामा
वसंत भोईर
वाडा : भिवंडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने उमेदवारी डावलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रदेश सरचिटणीस व कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी सोमवारी शहापूर येथे झालेल्या भूमिपुत्रांच्या निर्धार सभेत काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचे राजीनामे दिले असून लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत भूमिका घेण्यासाठी कुणबी समाजातील राजकीय धुरिणांची समिती नेमण्याची घोषणा करून येत्या तीन दिवसात तिच्या अहवालानुसार ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत. विश्वनाथ पाटील यांचे संभाव्य बंड लक्षात घेता कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार सुरेश टावरे यांना खूप सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत वाडा येथे झालेल्या कुणबी सेनेच्या मेळाव्यात विश्वनाथ पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
भिवंडी लोकसभेत असलेल्या सहा लाख कुणबी समाजाच्या एक गठ्ठा मतांवर लक्ष ठेवून काँग्रेसने तत्कालीन विद्यमान खासदार सुरेश टावरे यांचे तिकीट कापून विश्वनाथ पाटील यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. विशेष म्हणजे देशभरात मोदी लाट असतांना भिवंडी लोकसभेतून पाटील यांना सुमारे तीन लाख मते मिळाली तरी त्यांचा निसटता पराभव झाला.
2014 च्या लोकसभेत मिळविलेले मते लक्षात घेता काँग्रेस पक्ष आपल्याला पुन्हा उमेदवारी देईल असा विश्वास विश्वनाथ पाटील व त्यांच्या समर्थकांना होरा होता. परंतु तिकिटाच्या स्पर्धेत माजी खासदार सुरेश टावरे यांनी बाजी मारल्याने पाटील व त्यांच्या कुणबी सेनेचे कार्यकर्ते नाराज झाले आहे.
पान /३
दोन्ही उमेदवार आगरी असल्याने कुणबी समाज नाराज
भिवंडी लोकसभा मतदारसंघात सुमारे साडेसहा लाख कुणबी मतदार असताना भाजपा व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आगरी समाजातील उमेदवार दिल्याने वाडा तालुक्यातील बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजात दोन्ही पक्षांविषयी नाराजी आहे.
वंचित बहुजन आघाडीने मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू व कुणबी समाजातील नावाजलेले व्यक्तिमत्व डॉक्टर अरु ण सावंत यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. परंतु विश्वनाथ पाटलांसारख्या कुणबी समाज नेतृत्वाचे वजन लक्षात घेऊन ती उमेदवारी त्याना मिळाल्यास कुणबी समाजाचे धु्रवीकरण होऊ शकते.
खासदार कपिल पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर एकीकडे कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाचे भूमिपूजन वरिष्ठांच्या उपस्थित उरकून घेतले असताना दुसरीकडे गत निवडणुकीत वाडा तालुकावासियांना आश्वासन दिलेल्या कल्याण-भिवंडी-वाडा-डहाणू मार्गाविषयी चक्कार शब्दही उच्चारला नाही. त्याविषयी तालुक्यात नाराजी आहे.
बंडखोरांचे उपद्रवमूल्य : गुंता वाढला
काँग्रेस पक्षाने माजी खासदार सुरेश टावरे यांची उमेदवारी जाहीर करताच तिकिटाच्या शर्यतीतील काँग्रेसचे कुणबी समाजाचे नेते विश्वनाथ पाटील यांनी केलेली बंडखोरीची भाषा तसेच भिवंडी महानगरपालिकेतील काँग्रेसच्या नगरसेवकांनी सुरेश टावरे यांच्या विरोधात केलेल्या बंडामुळे मतदारसंघात नकारात्मक संदेश गेला आहे.
बंडोबांच्या या समिकरणामुळे भाजपच्या कपिल पाटील यांना धक्का बसू शकतो. त्यातच शिवसेनेचे सुरेश म्हात्रे हे कपिल पाटील यांचे कट्टर विरोधक असून त्यांनी सुरु वातीपासून पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. त्यांनी बंड केल्यास व वाडा तालुक्यातील नाराज शिवसैनिक त्यांच्या पाठीशी उभे राहिल्यास पाटलांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.