पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये एका इमारतीच्या २१ व्या मजल्यावरून पडून ७ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. बाळाची आई त्याला घेऊन बाल्कनीत उभी असताना तिचा तोल गेल्याने ही धक्कादायक घटना घडली, अशी माहिती बोळींज पोलीसांनी दिली. ही घटना विरार येथील बोळींज परिसरात बुधवारी दुपारी घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
ही घटना विरार पश्चिमेतील जॉय विले निवासी संकुलातील पिनॅकल इमारतीत घडली. या इमारतीत २१ व्या मजल्यावर राहत असलेले विकी सदाणे यांची पत्नी पूजा सदाणे हिने लग्नानंतर सात वर्षानंतर बाळाला जन्म दिला. घटनेच्या आदल्या दिवशी बाळाला सात महिने पूर्ण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी सव्वा तीन वाजताच्या सुमारास पूजा बाळाला घेऊन बाल्कनीत उभी होती. दरम्यान, खिडकी बंद करण्याचा प्रयत्न करत असताना जवळ साचलेल्या पाण्यावरून तिचा पाय घसरला आणि हातातून बाळ निसटून खाली जमिनीवर पडले. या घटनेत बाळाचा जागीच मृत्यू झाला.
बोळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला बाळाला खांद्यावर घेऊन बाल्कनीत उभी होती. त्यावेळी खिडकी बंद करण्याच्या प्रयत्नात तिचा तोल गेला आणि बाळ २१ व्या मजल्यावरून जमिनीवर पडले. या खिडकीला ग्रिल नव्हती. याप्रकरणी आपघाती मृत्युची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. दरम्यान, लग्नाच्या सात वर्षानंतर विकी आणि पूजा आई- वडील झाले होते. या घटनेने संपूर्ण सदाणे कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.