गाड्यांच्या काचा फोडल्याप्रकरणी गावकरी - पोलिसांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 22:51 IST2020-01-13T22:51:08+5:302020-01-13T22:51:18+5:30
नागरिक धास्तावले : गाड्या ठेवतात नातेवाइकांकडे

गाड्यांच्या काचा फोडल्याप्रकरणी गावकरी - पोलिसांची बैठक
वाडा : वाडा तालुक्यातील चिंचघर येथे गेल्या चार दिवसांत तीन गाड्यांच्या काचा फोडल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने येथील नागरिक धास्तावले असून ते आपली वाहने नातेवाईकांकडे ठेवत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाबाबत तसेच गावात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सोमवारी सकाळी कुडूस पोलीस दूरक्षेत्रात चिंचघर गावातील नागरिकांची बैठक बोलावण्यात आली होती.
लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावून आरोपींना अटक केली जाईल असे आश्वासन वाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद बोराडे यांनी या बैठकीत ग्रामस्थांना दिले. परिसरातील फोन टॅप करण्याबरोबरच सीसीटीव्हींची तपासणी करण्यात येत असून आरोपींना अटक करू असे आश्वासन पोलिसांनी ग्रामस्थांना दिले. या प्रकरणाचा छडा लवकरात लवकर न लावल्यास शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शिवसैनिकांनी दिला आहे.
गाडीच्या तोडफोड प्रकरणाचा येथील नागरिकांनी धसका घेतला असून आसपासच्या गावातील नातेवाईकांकडे चारचाकी गाड्या नेऊन ठेवत असल्याचे समोर आले आहे. कुडूस पोलीस दूरक्षेत्रात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
या बैठकीला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनिल पाटील, रेश्मा पाटील, निलेश पाटील, सचिन पाटील, जर्नादन भेरे, सुधीर पाटील, जिल्हा परिषद सदस्य राजेश मुकणे, पं.स.सदस्य राजेश मढवी, शिक्षक सेनेचे जिल्हा अध्यक्ष मनेश पाटील, भाजपचे तालुका सचिव मंगेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर, श्रमजीवीचे सचिन पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.