वाड्यातील भाजी मार्केट आजही दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 23:18 IST2019-11-16T23:18:32+5:302019-11-16T23:18:40+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष; भाजीविक्रेते सोयीसुविधांपासून वंचित

वाड्यातील भाजी मार्केट आजही दुर्लक्षित
वाडा : तालुक्यात वाडा येथे जय भवानी भाजी मार्केट व कुडूस येथे जनता भाजी मार्केट या दोन मार्केटना कुठल्याही प्रकारच्या सुविधा प्रशासनाकडून मिळत नसल्याने त्या पूर्णपणे दुर्लक्षित आहेत.
वाडा गावातील मार्केटची स्थापना १९९२ मध्ये झाली. तेव्हापासून आजतागायत या भाजी विक्रेत्यांना कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा नाहीत. भाजीविक्रेत्यांसाठी सुसज्ज असे दुकाने दिली गेली नाहीत. या भाजी मार्केटमध्ये त्याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. हे व्यापारी रस्त्यावर आल्याने वाहतूककोंडी होऊन त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाडा शहराच्या आजूबाजूच्या वीस ते पंचवीस गावपाड्यांची ही मुख्य बाजारपेठ आहे. शिवाय तालुक्यात सर्व सरकारी कार्यालय वाड्यातच आहेत. व्यापाऱ्यांसाठी भाजीपाला साठवून ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध नसल्याने ते पुरेसा भाजीपाला खरेदी करू शकत नाहीत. तालुक्यातील औद्योगिक पट्टा असल्याने तो चांगल्या प्रकारे विकसित झाला आहे. परंतु ग्रामपंचायतीच्या मालकीचे भाजी मार्केट नसल्याने रस्त्यावरच बसतात. कुडूस गावाचाही महसूल चांगला आहे. परंतु ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा नसल्याने सुसज्ज असे मार्केट होऊ शकत नाही.
वाडा तालुक्यातील भाजीपाला पिकविणारे शेतकरीही किरकोळ विक्रीसाठी येथे येत असल्याने व्यापाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे भाजी मार्केटमध्ये जागा अपुरी पडत असल्याने या व्यापाºयांना रस्त्यावर बसावे लागत आहे. प्रशासनाने स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी व्यापाºयांची आहे. या मार्केटमध्ये जागा अपुरी असल्याने व्यापारी रस्त्यावर बसतात. त्यामुळे गर्दीच्या वेळेत मात्र येथे वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होते. याची प्रशासनाने दखल घेऊन योग्य तो मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करावेत, असे येथील महिला ग्राहक दर्शना पाटील यांनी सांगितले.
सुसज्ज मार्केट संदर्भात नगरपंचायतीकडे प्रस्ताव तयार आहे. मात्र प्रशासनाकडून पाठपुरावा होत नसल्याने भाजी मार्केट दुर्लक्षित राहिले आहे.
- रामचंद्र जाधव, नगरसेवक
भाजी मार्केटसाठी कुडूस ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा नसल्याने अद्ययावत मंडईस अडचण येत आहे.
- अनिरु द्ध पाटील, ग्रामविकास अधिकारी
व्यापारी वर्ग कुडूसमध्ये भाजी मार्केट व्हावे यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु आमच्या प्रयत्नांना यश अजून आलेले नाही.
- हर्षल देसले, अध्यक्ष, व्यापारी संघटना