वसईत कायदा - सुव्यवस्थेची बोंब
By Admin | Updated: August 13, 2015 23:03 IST2015-08-13T23:03:25+5:302015-08-13T23:03:25+5:30
वसई-विरार उपप्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पूर्णपणे ढासळली असून दररोज दरोडे, बलात्कार, हत्या, गोळीबार, महिलांची मंगळसूत्रे खेचणे अशा गुन्ह्यांमध्ये वाढ होते आहे.

वसईत कायदा - सुव्यवस्थेची बोंब
वसई : वसई-विरार उपप्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पूर्णपणे ढासळली असून दररोज दरोडे, बलात्कार, हत्या, गोळीबार, महिलांची मंगळसूत्रे खेचणे अशा गुन्ह्यांमध्ये वाढ होते आहे. दिवसाढवळ्या मंगळसूत्र पळवण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने महिला भीतीच्या वातावरणात वावरत असतात. गेल्या ३ वर्षांत परिसरात अतिरिक्त पोलीस ठाणी स्थापन करण्यात आली, परंतु गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना अपयश आले आहे. त्यामुळे काही सामाजिक संस्थांनी उपप्रदेशात सागरी आयुक्तालय स्थापन करण्यात यावे, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. याप्रश्नी राज्य सरकार उदासीन दिसून येते.
काही वर्षांत उपप्रदेशातील गुन्हेगारी चढत्या कमानीवर आरूढ झाली असून नागरिक भीतीच्या वातावरणात राहत आहेत. ज्वेलर्सवरील दरोडे, दररोज घडणाऱ्या बलात्काराच्या घटना, सदनिका फोडणे, अशी शेकडो प्रकरणे गेल्या १५ वर्षांत घडली.
एकाही प्रकरणातील आरोपी शोधणे पोलिसांना शक्य झाले नाही. पूर्वी रात्रीच्या वेळी पोलिसांकडून कोम्बिंग आॅपरेशन होत असे. परंतु, हे आॅपरेशन आता बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आरोपी शोधणे पोलिसांना दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्भय जनमंचने सागरी आयुक्तालय स्थापन करण्यात यावे, अशी मागणी राज्याच्या गृह खात्याकडे केली, पण गृह खात्याने त्यांच्या या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या.
गेल्या काही दिवसांत गुन्हेगारी प्रवृत्तीने पुन्हा डोके वर काढले असून दरोडे टाकण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या चड्डी बनियान गँगने पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. लवकरच या सर्व प्रकरणी नागरिकांचे एक शिष्टमंडळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. (प्रतिनिधी)