वसईत टँकर लॉबीला सुगीचे दिवस

By Admin | Updated: March 23, 2016 01:58 IST2016-03-23T01:58:11+5:302016-03-23T01:58:11+5:30

सततच्या पाणी टंचाईमुळे आता टँकर लॉबीला पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. सूर्या प्रकल्पातून पाणी पुरवठा सुुरु झाल्यानंतर वसईतून टँकर हद्दपार झाले होते.

Vasaiet Tanker Lobby Sugar Day | वसईत टँकर लॉबीला सुगीचे दिवस

वसईत टँकर लॉबीला सुगीचे दिवस

शशी करपे, वसई
सततच्या पाणी टंचाईमुळे आता टँकर लॉबीला पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. सूर्या प्रकल्पातून पाणी पुरवठा सुुरु झाल्यानंतर वसईतून टँकर हद्दपार झाले होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून टँकर पुन्हा धावू लागले आहेत. याघडीला तालुक्यात टँकरची संख्या साडेसहाशेच्या घरात पोचली आहे. सध्या दहा हजार लिटरचा एकेक टँकर दिवसाला किमान चार फेऱ्या मारतात. किमान ५० हजारांहून अधिक कुटुंबे टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.
एकेकाळी टँकरमुळे वसईत दरवर्षी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हायचा. सूर्या पाणी पुरवठा योजनेने टँकरला हद्दपार केले होते. पण, लोकसंख्या वाढल्यामुळे टँकर पुन्हा धावू लागले आहेत. तालु्नयात साडेसहाशेहून अधिक टँकर असून सध्या पाण्याची गरज असल्याने दहा हजार लिटरचा एकेक टँकर दिवसाला चार फेरा मारतो. सर्वाधिक ३५० च्या आसपास टँकर एकट्या नालासोपारा परिसरात धावतात, असे नालासोपारा टँकर असोसिएशनचे म्हणणे आहे.
पूर्वी टँकर पश्चिम पट्ट्यातून पाणी उपसा करीत असत. बेसुमार उपशामुळे पाण्याची पातळी खाली गेल्याने तिथून टँकरला बंदी घालण्यात आली. आता धानीव, गोखीवरे, वालीव, पेल्हार, पारोळ, पेल्हार, उसगाव, उसगाव नदी, तानसा नदी, शिवनसई, खानिवडे, चंदनसार, भाटपाडा, विरार पूर्वेकडील फुलपाडा याभागातील विहीर आणि बोअरवेलमधून टँकर पाणी भरतात. खाजगी विहीर आणि बोअरवेल मालक पैशासाठी बेसुमार पाणी उपसा करु लागल्याने याभागातील पाण्याची पातळी खालावली असून गावकरी चिंतेत सापडले आहे. गावकऱ्यांच्या तक्रारीवरून वसईचे तहसिलदार गजेंद्र पाटोळे यांनी टंँकर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पाणी दूषित तरी दर मात्र वाढतेच
टँकर लॉबी पैसा कमावण्याच्या उद्देशाने मिळेल तिथून पाणी भरून आणून शहरात विकतात. या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नसल्याने दूषित पाणी पिण्याशिवाय लोकांना पर्याय नसते. एरव्ही पावसाळा ते फेब्रुवारीपर्यंत टँकरचे दर ९०० ते १२०० रुपये असतात. आता टँकरचे दर वाढू लागले असून सध्या किमान १५०० रुपये आकारले जात आहे. जसजशी पाणी टंचाईची झळ वाढायला सुरुवात होईल तसतसा टँकरचा दर दोन हजार रुपयांच्या घरात पोचलेला असेल.
अनेक टँकर जुनाट, गळके, अनफिट
आरटीओ कार्यालयामध्ये सुमारे २२५ टँकरची नोंद आहे. काही टँकरची नोंद ठाणे येथे झाल्याचे गृहीत धरले तरी किमान तीनशे टँकर बेकायदेशिर धंदा करीत आहेत. मुंबईत आठ वर्षांपेक्षा जुने झालेले ट्रक वापरण्यास बंदी आहे. याच ट्रकमध्ये फेरबदल करून त्याचे टँकरमध्ये बेकायदेशिरपणे रुपांतर करून वसईत त्याचा वापर केला जातो. अनेक टँकर जुनाट, गळके, फिटनेस नसलेले आहेत. याची माहिती आरटीओ आणि वाहतूक पोलिसांना आहे. पण, रहदारीच्या रस्त्यावर भरधाव वेगाने चालवून दर महिन्याला दोन-तीन अपघात करणाऱ्या, वर्षाला किमान दोन-तीन लोकांचा जीव घेणाऱ्या टँकरविरोधात आरटीओ अथवा पोलीस कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते.

Web Title: Vasaiet Tanker Lobby Sugar Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.