वसई-विरारकर पाहत आहेत एसटी बसची आतुरतेने वाट; नागरिकांचे हाल सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 12:20 AM2020-11-29T00:20:50+5:302020-11-29T00:20:57+5:30

महापालिकेची परिवहन सेवा अद्याप बंदच

Vasai-Virarkar are eagerly waiting for the ST bus; Citizens' situation continues | वसई-विरारकर पाहत आहेत एसटी बसची आतुरतेने वाट; नागरिकांचे हाल सुरू

वसई-विरारकर पाहत आहेत एसटी बसची आतुरतेने वाट; नागरिकांचे हाल सुरू

Next

वसई : वसई-विरारच्या शहरी व ग्रामीण भागात पोहोचलेली महापालिकेची परिवहन सेवा अद्यापही बंद असून पालिकेने नव्याने ठेकेदार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या विलंबामुळे वसईतील सर्वसामान्य नागरिकांचे मात्र पुरते हाल होत आहेत. यामुळे आता वसईकर एसटी बसेसची आतुरतेने वाट पाहत आहेत.

वसईकरांसाठी एसटी सेवा सुरू करण्याचे साकडे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांना शिवसेनेच्या मिलिंद खानोलकर यांनी दोन दिवसांपूर्वी घातले आहे. वसईतील नागरिकांच्या सोयीसाठी एसटी तातडीने सुरू करावी, अशी मागणी आता वसईकरांमधूनही केली जात आहे. दरम्यान, राज्य परिवहन सेवा मंडळाची एसटीची सेवा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. ही सेवा वसई तालुक्यातही सुरू होती.
वसईत १५० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून नगरपरिषद अस्तित्वात होती. शिक्षण, व्यवसाय, नोकरी अशा अनेक कारणास्तव वसईकर हे मुंबईवर अवलंबून असताना एसटी सेवाच बंद आहे हे दुर्दैव आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेचा प्रवास करण्यासाठी ग्रामीण भागातून रेल्वे स्थानकात पोहोचण्याकरिता बहुतांश किलोमीटरचा प्रवास एसटीने पार करून वसईकर मुंबईकडे जात होते. मात्र महापालिकेची परिवहन सेवा सुरू झाल्याने तोट्याचे कारण देत एसटीने वसई-विरारमध्ये सेवा देण्यास नकार दिला होता. त्यामुळे महापालिकेची परिवहन सेवा हद्दीत सेवा देते, मात्र कोरोनाच्या काळात बंद झालेली परिवहन सेवा अजूनही बंदच आहे. त्यामुळे वसईकरांना दळणवळणाचे स्वस्त साधनही आता उरले नाही.

एसटी सेवा म्हणजे उद्योगास चालना

  • पहाटेच्या वेळी ३.३० वाजताच्या चर्चगेट लोकलसाठी रेल्वे स्थानक गाठण्यासाठी आणि रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास शेवटच्या चर्चगेट-विरार लोकलने परतीच्या प्रवासी नागरिकांसाठी वर्षानुवर्षे एसटीची सेवा मिळत होती. 
  • वसईचे दूधविक्रेते, फुलविक्रेते, भाजीविक्रेते, शिक्षिका, विद्यार्थी, नोकरवर्ग यांच्यासाठी ही व्यवस्था कमी खर्चिक असल्याने मोठ्या प्रमाणावर एसटीमधून प्रवास होत होता. मात्र आज ग्रामीण भागात रात्री व पहाटेच्या वेळी रिक्षा किंवा कोणतीही अन्य परिवहनाची सोय नाही. 

Web Title: Vasai-Virarkar are eagerly waiting for the ST bus; Citizens' situation continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.