वसई-विरार पालिका निवडणूक : यंदा 'बविआ'ची सत्ता की पलटणार बाजी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 12:11 IST2025-12-16T12:10:37+5:302025-12-16T12:11:04+5:30
पालघर जिल्ह्यात लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने वसई-विरार हे मोठे शहर असून शहरातील राजकीय घडामोडींचा जिल्ह्याच्या राजकारणात मोठा परिणाम दिसतो.

वसई-विरार पालिका निवडणूक : यंदा 'बविआ'ची सत्ता की पलटणार बाजी?
मंगेश कराळे
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : पालघर जिल्ह्यात लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने वसई-विरार हे मोठे शहर असून शहरातील राजकीय घडामोडींचा जिल्ह्याच्या राजकारणात मोठा परिणाम दिसतो. गेल्या साडेतीन दशकांपासून बहुजन विकास आघाडीची वसई-विरार मनपावर सत्ता आहे, तर 'बविआ'चे आमदारही होते. मात्र, गेल्यावर्षी झालेल्या आमदारकीच्या निवडणुकीत 'बविआ'ला वसई-विरारमध्ये पराभव चाखावा लागला. त्यामुळे या निवडणुकीत वसई-विरार पालिकेतर 'बविआ'ची सत्ता कायम राहणार की सत्तापालट होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
वसई-विरार मनपाची मुदत २०२० च्या जुलै महिन्यात संपुष्टात आली होती. वसई-विरारच्या कार्यक्षेत्रात बोईसर, नालासोपारा आणि वसई असे तीन मतदारसंघ येतात. नालासोपारा हा सर्वाधिक मतदार असलेला मतदारसंघ आहे. या निवडणुकीत नालासोपारा मतदारसंघातील ६ लाख ५६ हजार १९८, वसईमधील ३ लाख १२ हजार २६६ आणि १ लाख ३७ हजार ६७१ इतके मतदार आहेत. या सर्व मतदारांवरच ११५ नगरसेवकांचे भवितव्य ठरणार आहे.
मागील निवडणुकीचे पक्षीय बलाबल - ११५ नगरसेवक
बविआ - १०८
शिवसेना - ५
भाजप - १
मनसे - १
शिवसेनेचे ५ सदस्य असून शिंदेसेनेत २, उद्धवसेनेत २ आणि १ तटस्थ आहेत.
बविआकडे १०८ नगरसेवक होते. त्यापैकी ९ भाजपत, २ शिंदेसेनेत गेले, ८ जणांचा मृत्यू झाला.
राजीव पाटील किंगमेकर
बविआचे तिन्ही आमदार पराभूत झाले असून मनपात बविआची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. भाजप मनपा निवडणुकीत सत्ता मिळवून महापौर बसविण्याच्या तयारीत आहे. या निवडणुकीत कामगार नेते राजीव पाटील ज्या पक्षाला मदत करतील त्या पक्षाचे नगरसेवक निवडून येतील.