धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी वसई तालुक्याला ७ कोटी
By Admin | Updated: March 23, 2017 01:16 IST2017-03-23T01:16:44+5:302017-03-23T01:16:44+5:30
वसई समुद्रकिनारी धूपप्रतिबंधक बंधारे आणि रस्ते बांधण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात ११ कोटी रुपयांची तरतूद केल्याची

धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी वसई तालुक्याला ७ कोटी
वसई : वसई समुद्रकिनारी धूपप्रतिबंधक बंधारे आणि रस्ते बांधण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात ११ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती पालकमंत्री विष्णू सवरा यांनी वसईत भाजपाचा जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत दिली.
ही बैठक कळंब येथे पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष साटम, सरचिटणीस राजन नाईक, उपाध्यक्ष मनोज पाटील, महेंद्र पाटील, के. डी. घरत, रामदास मेहेर, जितेंद्र मेहेर, आशिष जोशी यांच्यासह पदाधिकारी हजर होते.
वसईतील समुद्रकिनाऱ्याची धूप थांबवण्यासाठी अर्नाळा किल्ला, रानगाव, कळंब, भुईगाव समुद्रकिनारी धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ७ कोटी ७० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
वसई तालुक्यातील सातिवली-कामण या राज्यमार्गासाठी १ कोटी ३९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर नालासोपारा-गोखीवरे-वालीव या राज्यमार्गासाठी १ कोटी २६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती ही त्यांनी दिली. आता प्रत्यक्षात या निधीतून होणाऱ्या कामांना सुरुवात कधी होते. व ती पूर्ण कधी होतात याकडे स्थानिकांचे लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)