वसई तालुका कला-क्रीडा महोत्सव उद्यापासून
By Admin | Updated: December 25, 2016 00:25 IST2016-12-25T00:25:47+5:302016-12-25T00:25:47+5:30
२७ व्या वसई तालुका कला-क्रीडा महोत्सवाला येत्या सोमवारपासून सुरुवात होत आहे. यंदाच्या महोत्सवात जिल्हास्तरीय किक बॉक्सिंगसह योगासने, जलतरण, लगोरी स्पर्धांचाही समावेश करण्यात

वसई तालुका कला-क्रीडा महोत्सव उद्यापासून
वसई : २७ व्या वसई तालुका कला-क्रीडा महोत्सवाला येत्या सोमवारपासून सुरुवात होत आहे. यंदाच्या महोत्सवात जिल्हास्तरीय किक बॉक्सिंगसह योगासने, जलतरण, लगोरी स्पर्धांचाही समावेश करण्यात आला आहे. ३१ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या महोत्सवात विविध ६८ कला आणि क्रीडा स्पर्धांचा समावेश असून यंदा ५० हजारांहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला आहे.
लिम्का बुकात नोंद झालेल्या वसई तालुका कला-क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी संध्याकाळी वसईच्या चिमाजी अप्पा मैदानावर होणार आहे. त्याआधी विरारहून क्रीडा ज्योत निघेल. ज्योतीचे आगमन झाल्यानंतर ध्वजसंचलानाने महोत्सवाला सुरुवात होईल. माजी कसोटीपटू श्रीसंत, निर्माता-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, राजेश म्हापुसकर, वसई विरार महापालिका आयुक्त सतीश लोखडे, महापौर प्रवीणा ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, आमदार विलास तरे , माजी खासदार बळीराम जाधव, माजी महापौर राजीव पाटील, नारायण मानकर यावेळी उपस्थित राहणार आहेत. तर अध्यस्थानी आमदार हितेंद्र ठाकूर असणार आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या महोत्सवात सिने क्षेत्रातील अनेक दिग्गज कलावंत भेट देणार असल्याची माहिती महोत्सवाचे कार्याध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी दिली.
महोत्सवात दरवर्षी कला आणि क्रीडा विभागात ६८ स्पर्धा होतात. यंदा त्यात किक बॉक्सिंग, योगासने, जलतरण आणि लगोरी स्पर्धांची भर पडली आहे. विजेते, उपविजेते संघ, वैयक्तिक क्षमतेचे सुवर्ण, रौप्य, ब्राँझ पदक विजेते, उत्तेजनार्थ पात्र कलावंत व क्रीडापटूंना एकूण चार हजारांहून अधिक प्रमाणपत्रे आणि प्रत्येकी ७०० सुवर्ण, रौप्य, ब्राँझ पदके देऊन गौरवण्यात येते. सांघिक स्पर्धांना रोख बक्षिसे दिली जातात. कला आणि क्रीडा विभागात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या शाळा अथवा संस्थांना स्वतंत्र चषक देऊन सन्मानित केले जाते.
क्रीडा विभागात यंदा कब्बडीचे २९०, खो-खोचे १११, लंगडीचे ७१ आणि लगोरीचे ५७ संघ मैदानात उतरणार आहेत. महोत्सवातील वसई श्री आणि मिस्टर पर्सनॅलिटी व मिस पर्सनॅलिटी अर्थात फॅशन शो मुख्य आकर्षण असते. (प्रतिनिधी)