वसई साहित्य-कला महोत्सवाचे सूप वाजले

By Admin | Updated: September 29, 2015 01:00 IST2015-09-29T01:00:58+5:302015-09-29T01:00:58+5:30

वसईतील सहयोग या संस्थेद्वारे नुकताच वसई साहित्य व कला महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या दोन्ही दिवशी साहित्यप्रेमी नागरिकांना विविध

The Vasai Sahitya-Kala Mahotsava soup was started | वसई साहित्य-कला महोत्सवाचे सूप वाजले

वसई साहित्य-कला महोत्सवाचे सूप वाजले

वसई : वसईतील सहयोग या संस्थेद्वारे नुकताच वसई साहित्य व कला महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या दोन्ही दिवशी साहित्यप्रेमी नागरिकांना विविध विषयांवरील मान्यवरांच्या चर्चा तसेच व्याख्यानांचा आस्वाद घेता आला.
महोत्सवाला ग्रंथदिंंडीने सुरुवात झाली. पहिल्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम झाला. वर्तमानपत्राला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते, परंतु ते खरे नसून लोकशाहीत फक्त लोकसभा, न्यायपालिका व लोकशाही हेच खरे तीन स्तंभ आहेत, असे टिकेकर या वेळी म्हणाले. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी वृत्तपत्रांपुढे एक ध्येय होते, पण स्वातंत्र्य मिळताच ते ध्येय नष्ट झाले. वृत्तपत्रांचे स्वरूप बदलून त्यांचा व्यवसाय झाला. २४ तास बातम्या हा मूर्खपणाच आहे. मी म्हणतो तसे झालेच पाहिजे, असे म्हणणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे. गेल्या ५० वर्षांत आपण जे गमावले, त्याचादेखील आता विचार होणे अत्यंत गरजेचे आहे. या गप्पांच्या मैफलीमध्ये अनेक मान्यवरांनी आपली मते मांडली. हिंदी लेखिका सुधा अरोडा, लोककलेच्या अभ्यासक निर्मला डोसी व तंत्राधीक्षक जनार्दन गोंड इ. मान्यवर उपस्थित होते. या वेळी जनार्दन गोंड यांनी छत्तीसगढ येथील नक्षलवादावर आपली परखड मते मांडली. ते म्हणाले, ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्याचे आजवर प्रयत्न झाले नाहीत. जंगलात वास्तव्य करणाऱ्या ८ कोटी जनतेला नक्षलवादी ठरवून छळ करण्यात येतोय. त्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. ज्या देशात आजही अन्न, वस्त्र, निवाऱ्याचा प्रश्न सुटू शकला नाही, तेथे राष्ट्र उत्पन्नाचा सर्वाधिक हिस्सा शस्त्रखरेदीसाठी वापरला जात आहे. माध्यमांमध्येही आदिवासींच्या प्रश्नांची चर्चा होत नाही, मग त्यांनी या देशावर पे्रम का करावे, असा प्रश्न निर्माण होतो.
दुसऱ्या दिवशी रविवारी उद्योजक डॉ. नरेश भरडे यांनी आपण प्रतिकूल परिस्थितीतून कसे घडलो व देशभरात आपला उद्योग कसा वाढवू शकलो, हे सविस्तर सांगताना आपल्या आईची साथ कशी मिळाली, यावरही प्रकाश टाकला. त्यानंतर, समाजात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी प्रसिद्ध चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फा. फ्रान्सिस दिब्रिटो उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The Vasai Sahitya-Kala Mahotsava soup was started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.